राज्याच्या राजधानीचं शहर असलेल्या मुंबईतील प्रदूषणात कमालीची वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील वाढतं हवा प्रदूषण सध्या चिंतेचा विषय बनला आहे. आता मुंबई पाठोपाठ राज्याचं सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या पुण्याच्याही हवा बिघडली आहे. चांगल्या वातावरणासाठी ओळखलं जाणारं पुणे शहर आता हवेच्या गुणवत्तेबाबत दिल्ली आणि मुंबईच्या पंगतीत जाऊन बसलं आहे. पुण्यानं दिल्ली आणि मुंबईलाही हवेच्या गुणवत्ता बाबत मागे टाकलं आहे. मुंबई आणि दिल्ली पेक्षा पिंपरी चिंचवड,पुण्यातील हवेची गुणवत्ता खालावल्याचं चित्र बघायला मिळत आहे.
पिंपरी चिंचवड,पुण्यातील हवा गुणवत्ता निर्देशांक 161 वर असून मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक 145 वर आहे. पुण्यातील गजबजलेल्या शिवाजीनगर परिसरातील एक्यूआय वाईट श्रेणीत असून हवा गुणवत्ता पातळी 271 वर तर भुमकर चौकातील एक्यूआय 260 वर आहे. पुण्यातील पाषाण आणि कात्रजचा परिसर सोडता सर्वत्र हवा गुणवत्ता पातळी मॉडरेट श्रेणीत आहेत. तसेच, हिवाळ्यात मागील चार वर्षात मुंबईतील हवा गुणवत्ता दिल्लीपेक्षा वाईट स्थितीत असल्याचे अनेक संस्थांचा अभ्यासातून बघायला मिळत आहे.
दरम्यान, मुंबईसह पुण्याच्या हवेची गुणवत्ता देखील खालावत चालली आहे. पर्यावरणाशी निगडित अनेक कायदे असूनही त्यांचं पालन केलं जात नाही. पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये सुरू असलेले प्रकल्प, इथली वाहतूक व्यवस्था या सगळ्यामुळे प्रदूषणात भर पडत आहे. हे प्रदूषण रोखण्याचं मोठं आव्हान प्रशासन आणि नागरिकांसमोर आहे.