शहरातील विविध परिसरांसाठी ‘आय लव्ह …’ असे फलक लावून शहराचे विद्रुपीकरण झाल्यानंतर व त्यावर मोठा खर्च झाल्यानंतर महापालिकेला उपरती झाली आहे. पादचारी मार्गावर, रस्त्यावर अडथळा निर्माण करणारे, अनधिकृत वीजजोड घेतलेले शहरातील असे ७३ फलक येत्या तीन दिवसांत हटविण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी काढले आहेत.
‘आय लव्ह’ अशी संकल्पना असलेल्या सेल्फी पॉइंट्सची लाट अचानक निर्माण झाली. त्यानंतर सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्यावर स्वार होऊन शहराच्या विविध भागांत असे पॉइंट्स उभारले. त्यासाठी नगरसेवकांनी ‘स’ यादीतून दोन ते दहा लाख रुपयांपर्यंतचा निधी खर्च केला. संकल्पना म्हणून स्वतःच्या नावाची जाहिरातही केली. हे काम करताना पथ अथवा विद्युत विभागाला अंधारात ठेवले गेले.
या फलकांमुळे फायदा होण्याऐवजी पार्किंगमध्ये अडथळे निर्माण झाले; तर अनेक ठिकाणी पदपथावरची जागाही व्यापली गेली. त्यामुळे नागरिकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनीही या विरोधात पालिकेकडे तक्रारी केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांनी या फलकांची माहिती संकलित करण्याचे आदेश आकाशचिन्ह विभागाला दिले. आकाशचिन्ह विभागाचे तत्कालीन उपायुक्त यशवंत माने यांनी अशा ७३ फलकांची माहिती असलेला अहवाल आयुक्तांकडे सादर केला होता. यामध्ये हे फलक बेकायदा असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. त्यानुसार आयुक्तांनी जुलै महिन्यातच कारवाईचे आदेश दिले. मात्र, त्यावर कार्यवाही न झाल्याने अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी २१ सप्टेंबर रोजी लेखी आदेश काढून कारवाईच्या सूचना दिल्या. मात्र, त्यानंतरच्या आठ दिवसांतदेखील कारवाई झाली नाही. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांकडून विविध कारणे दिली गेली. या पार्श्वभूमीवर आयुक्त विक्रमकुमार यांनी तीन दिवसांत हे सर्व फलक काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.
वाहतुकीला अडथळा ठरणारे, आकाशचिन्ह विभागाची, विद्युत विभागाची परवानगी न घेता उभारलेले ‘आय लव्ह’चे बोर्ड काढून टाकण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. पुढील तीन दिवसांत ही कारवाई केली जाईल. टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. – विक्रमकुमार, महापालिका आयुक्त तथा प्रशासक