पुणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या श्री गणेश सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी नंदकुमार उर्फ विजय वासुदेव बानगुडे आणि उपाध्यक्षपदी राहुल विलास परदेशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हा उपनिबंधक संजय राउत, निवडणूक निर्णय अधिकारी अरुण साकोरे आणि बँकेचे व्यवस्थापक प्रशांत गायकवाड यांच्या उपस्थितीत ही निवड बिनविरोध झाली. पुण्याचे माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या नेतृत्वाखाली श्री स्वामी समर्थ पॅनेलने या निवडणुकीत पूर्ण यश मिळवले होते. माजी उपमहापौर आबा बागुल यांचे ही मार्गदर्शन लाभले होते.
याप्रसंगी श्री दीपक मानकर यांचे स्वागत नवनिर्वाचित संचालक रमेश भंडारी यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. श्री दीपक मानकर यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. ‘आजचा कर्जदार उद्याचा ठेवीदार कसा होईल यासाठी या नव्या टीम ने काम करावे तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडविण्याला प्राधान्य द्यावा’ असे याप्रसंगी श्री दीपक मानकर यांनी आपल्या भाषणात सांगितले. यावेळी सर्व नवनिर्वाचित संचालक, बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
श्री. नंदकुमार उर्फ विजय वासुदेव बानगुडे (वय 56 वर्षे) हे पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात काम करीत असून ते पुणे नवरात्रौ सांस्कृतिक महोत्सव आणि शिवदर्शन गणेशोत्सव मित्रमंडळ या दोन्हींचे कोषाध्यक्ष आहेत. पुणे नवरात्रौ महोत्सवातर्फे आयोजित विनामुल्य काशी यात्रेच्या आयोजनात त्यांचा मोठा सहभाग असतो. तसेच अनेक सामाजिक व धार्मिक उपक्रमातही त्यांचा सहभाग असतो.
उपाध्यक्षपदी निवड झालेले राहुल विलास परदेशी (वय 46 वर्षे) हे पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात काम करीत असून हडपसर परिसरातील अनेक सार्वजनिक, सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा मोठा सहभाग असतो.