Monday, December 4, 2023
Homeमहाराष्ट्रपुणे महामेट्रो करणार सर्वंकष वाहतूक आराखडा, निगडी ते हिंजवडी मेट्रो धावणार

पुणे महामेट्रो करणार सर्वंकष वाहतूक आराखडा, निगडी ते हिंजवडी मेट्रो धावणार

पुणे, पिंपरी-चिंचवड शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी पुणे महामेट्रोने सर्वंकष वाहतूक आराखडा (काँप्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन) तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. पुढील सहा महिन्यांत त्याचे काम पूर्ण होईल. त्यानंतर मेट्रोचे नवीन मार्ग करण्यात येणार असून, निगडी ते हिंजवडी अशी नवीन मेट्रो मार्गिका तयार करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

वर्षाला सव्वालाख लोकसंख्येची भर पडत आहे. त्यामुळे वाहतुकीचे सर्वेक्षण आवश्यक आहे. शहरातील प्रमुख रस्त्यावरून तासाला दुचाकी, चारचाकी, बस, ट्रक, तीनचाकी अशी किती वाहने धावतात. कोणत्या दिशेने जातात. पादचाऱ्यांचे प्रमाण किती आहे. विशिष्ट वेळेत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे हे सर्वेक्षण केले जाणार आहे. ज्या मार्गावर जास्त वर्दळ राहील याचा अंदाज घेऊन नवीन मेट्रो मार्ग विकसित केला जाणार आहे. मेट्रोचे कासारवाडी स्थानक वर्दळीचे आहे. नाशिक फाटा येथून नाशिकला आणि चाकणला जाणाऱ्या लोकांची संख्या किती याचा अभ्यास केला जाणार आहे. नाशिक फाटा ते चाकण आणि वर्तुळाकार रस्त्यांवर (एचसीएमटीआर) ‘निओ मेट्रो’ विकसित करण्यासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रवासी संख्या वाढण्यासाठी उद्योजकांशी चर्चा
पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक कंपन्यांमधील अनेक कामगार पुण्यातून कंपनीच्या खासगी बसने प्रवास करतात. या कामगारांनी मेट्रोने प्रवास करावा यासाठी त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. कामगारांनी वल्लभनगरपर्यंत मेट्रोने आणि तेथून खासगी बसने प्रवास करावा, असे प्रयत्न सुरू आहेत.

मेट्रो स्थानकापर्यंत पायीच येणे अपेक्षित
दिल्लीत लोक पायी, सार्वजनिक वाहतुकीने मेट्रो स्थानकापर्यंत येतात. त्यामुळे तेथील मेट्रोला प्रतिसाद मिळतो. मेट्रो स्थानकावर वाहनतळाची व्यवस्था करणे कठीण आहे. नागरिकांनी मेट्रो स्थानकापर्यंत पायीच येणे अपेक्षित आहे. त्यासाठी पादचारी मार्ग विकसित केले जात आहेत. स्थानकापर्यंत येण्यासाठी पीएमपी, रिक्षाची व्यवस्था सुरू करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments