पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात पिफ पुढे ढकलण्यात आला आहे. 12 ते 19 जानेवारी दरम्यान पुण्यात हा चित्रपट महोत्सव होणार होता. मात्र काही अपरिहार्य कारणामुळे हा चित्रपट महोत्सव पुढे ढकलण्यात आल्याचं पुणे फिल्म फौंडेशनचे अध्यक्ष जब्बार पटेल यांनी सांगितलं आहे.
पुणे फिल्म फौंडेशन आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात येते. यंदाचं चित्रपट मोहत्सवाचं एकवीसावं वर्ष आहे. 2023 मध्ये होणाऱ्या या महोत्सवाची तयारीला सुरुवात झाली होती. सप्टेंबर महिन्यापासून स्पर्धेच्या प्रवेशिका स्विकारण्यास सुरुवात झाली होती. 2022 मध्ये सेन्सॉर मिळालेल्या आणि सेन्सॉर न मिळालेल्या अशा दोन्ही प्रकारच्या मराठी चित्रपटांना प्रवेश अर्ज करता येणार होता. पिफ 2023 दिनांक 12 ते 19 जानेवारी दरम्यान पुण्यात रंगणार होता मात्र काही कारणामुळे हा महोत्सव पुढे ढकलण्यात आला आहे.
चित्रपट नोंदणीच्या अटी
चित्रपटाचे शिर्षक आणि बॅनर हे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळात नोंदणीकृत असावे. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीतच सिनेमा पूर्ण केला गेलेला असावा.चित्रपटाचं कोणतेही पोस्ट-प्रोडक्शन संबंधी काम बाकी नसावे. संबंधित चित्रपटाची निर्मिती ही सन 2022 मध्येच झाली आहे. यासाठी लॅब किंवा स्टुडीओचे पूर्ततापत्र सादर करून आणि त्याची डीसीपी प्रिंट दाखवणं बंधनकारण आहे. या सगळ्यांची पूर्तता पिफ 2023 साठी अर्ज करणाऱ्या चित्रपट निर्मात्यांनी करायची आहे. हे प्रमाणपत्र फक्त 21 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा करीता ग्राह्य धरण्यात येणार आहे, अशी माहितीदेखील पुणे फिल्म फौंडेशनतर्फे देण्यात आली होती.