‘अश्विनीने पुण्यात शिक्षण घेतले, तिला नोकरीही मिळाली होती. मात्र, आमच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे…’ कल्याणीनगर येथील अपघातात जीव गमावलेल्या अश्विनीचे वडील सुरेशा कोस्टा हतबल होऊन बोलत होते, तर ‘आमच्या नातवाचा बळी घेणाऱ्या आरोपीला तीनशे शब्दांचा निबंध लिहायला सांगून जामीन देणे हा कोणता न्याय आहे,’ अशी उद्विग्न प्रतिक्रिया अनिसचे आजोबा आत्माराम अवधिया यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
पुण्यातील बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाच्या भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने मृत्युमुखी पडलेल्या अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांच्यावर सोमवारी त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. अश्विनी कोस्टा ही मध्य प्रदेशातील जबलपूरची, तर अनिस हा उमरिया जिल्ह्यातील बिरसिंहपूर पाली गावाचा रहिवासी होता.
‘राज्यघटना आणि कायद्याच्या आधारे दोषींवर कारवाई व्हावी. अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देणे चुकीचे आहे. आमची मुले मोठी झाल्याशिवाय आम्ही त्यांना वाहन चालवायला दिले नाही,’ असे सुरेश कोस्टा म्हणाले. दुसरीकडे अनीसच्या अपघाती मृत्यूचे दु:ख त्याची आई आणि आजीला सहन होत नव्हते. ‘अनीस महिनाभरापूर्वी घरी आला होता. त्याचे लवकर लग्न करून घरी सून आणण्याचे स्वप्न आई पाहायची; परंतु आता सारा आनंद हिरावला गेला,’ असे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले.
कल्याणीनगर येथील प्राणांतिक अपघातप्रकरणी अल्पवयीन कारचालकावर दाखल केलेल्या गुन्ह्यात आता दारू पिऊन गाडी चालविल्याचे कलम समाविष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यात पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३०४, ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ आणि मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या १८४, ११९ आणि १७७ नुसार गुन्हा दाखल केला होता. त्यात आता पोलिसांनी कलमवाढ करून मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या १८५ची कलमवाढ केली आहे.