पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ अंतर्गत येत्या गुरुवार, दि. १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या वतीने पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून अधिकृत अधिसूचना निर्गमित करण्यात आली असून, ही सार्वजनिक सुट्टी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक क्षेत्रापुरती लागू राहणार आहे. सदर सुट्टी केंद्र व राज्य शासनाची सर्व शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका तसेच संबंधित आस्थापनांना लागू राहील.
तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक क्षेत्रातील मतदार जर शहराबाहेर कार्यरत असतील, तरी त्यांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी ही सार्वजनिक सुट्टी लागू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी प्रत्येक पात्र मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी केले आहे. मतदानातूनच लोकशाही अधिक बळकट होते, असेही त्यांनी नमूद केले आहे.


