लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पिंपरी-चिंचवडनंतर पुण्यातील लाचखोरांना आता लक्ष्य करण्यास सुरवात केली आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यातील ‘पीएसआय’ शंकर धोडिंबा कुंभारे (वय ४३) याला त्यांनी आज बुधवारी संभाजी पोलीस चौकीतच १५ हजार रुपयांची लाच घेताना पकडले. एबीसीच्या कारवाया वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
तीन दिवसांपूर्वीही (३१ जुलै) ‘एबीसी’ने राज्याच्या वैधमापन शास्त्र खात्याच्या पुणे विभागाचे सह-नियंत्रक डॉ. ललित बेनीराम हरोळे (वय ५५) या ‘क्लास वन’ अधिकाऱ्याला येरवडा येथील त्यांच्या कार्यालयातच ३१ हजार रुपयांची लाच त्यांच्याच विभागातील निरीक्षकाकडून घेताना पकडले होते.
आजच्या घटनेत लाचखोरीत पकडलेला ‘पीएसआय’ कुंभारे हा ‘क्लास टू’ अधिकारी आहे. त्याने पन्नास हजार रुपयांची लाच ‘एसीबी’च्या पन्नास वर्षीय तक्रारदाराकडे मागितली होती. नंतर तीस हजारावर तडजोड केली. त्यातील पहिला १५ हजाराचा हफ्ता चौकीतच घेण्याचे धाडस त्याने केले. ज्याच्याकडून त्याने ही लाच घेतली त्याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात एक तक्रार अर्ज करण्यात आला होता.
त्याची चौकशी कुंभारेकडे होती. त्याने त्यात गुन्हा दाखल न करण्यासाठी ही लाच मागून ती घेतली होती. पुणे एसीबीचे एसपी अमोल तांबे,अॅडिशनल एसपी शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आल्याचे डीवायएसपी नितीन जाधव यांनी सांगितले. एसीबीचे पीआय प्रवीण निंबाळकर पुढील तपास करीत आहेत.