Tuesday, March 18, 2025
Homeअर्थविश्वसलून, ब्युटी पार्लर बंद ठेवण्यास व्यावसायिकांचा तीव्र विरोध

सलून, ब्युटी पार्लर बंद ठेवण्यास व्यावसायिकांचा तीव्र विरोध

६ एप्रिल २०२१,
करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी महिनाभर सलून, ब्युटी पार्लर व्यवसाय बंद ठेवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला सलून व ब्युटी पार्लर व्यावसायिकांनी तीव्र विरोध केला आहे. आधीच्या लॉकडाउनमुळे या व्यवसायाचे कंबरडे मोडले असून, राज्यात १९ व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र, सरकारने या व्यवसायाला एका पैशाचीही मदत केली नाही. उलट पुन्हा व्यवसाय बंद ठेवण्याचा घाट घातला असून, त्यामुळे करोना जाणार आहे का, असा उद्विग्न प्रश्न सलून व ब्युटी पार्लर व्यावसायिकांकडून केला जात आहे.

‘सलून व ब्युटी पार्लर व्यवसाय बंद ठेवण्याचा सरकारचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे,’ अशा शब्दांत सलून व्यावसायिक हेमंत श्रीखंडे यांनी निषेध व्यक्त केला. ‘पहिल्या लॉकडाउनमधूनच आम्ही अद्याप सावरलेलो नाही. त्या काळातले दुकान भाडे, वीजबिल अजूनही थोडे थोडे करून फेडत आहोत. व्यवसाय पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा सरकारने आमच्या माथी लॉकडाउन मारला आहे. व्यवसाय बंद असेल, तर कुटुंबाचा खर्च, मुलांची शिक्षणे, घराचे व दुकानाचे भाडे, वीजबिले, कारागिरांचे पगार आदी खर्च कसा भागवायचा,’ अशी व्यथाही त्यांनी व्यक्त केली.

सलून व्यावसायिकांप्रमाणेच त्यांच्याकडे काम करणाऱ्या कारागिरांच्याही उदरनिर्वाहावर या निर्णयाचा मोठा परिणाम होणार आहे. ‘सलून आणि ब्युटी पार्लरच्या दुकानांवरच आमचे जगणे अवलंबून आहे. तेच अचानक बंद झाल्याने आम्ही घरखर्च कसा चालवायचा,’ अशा शब्दांत कारागीर प्रशांत गायकवाड यांनी नाराजी मांडली.

‘पहिल्या लॉकडाउनच्या काळात तीन ते साडेतीन महिने सलून दुकान बंद होते. त्यामुळे प्रचंड अडचणी आल्या. त्यानंतर दुकान सुरू झाल्यावर आम्ही करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून ग्राहकांना सेवा देत होतो. हातमोजे, मास्क वापरणे, ग्राहकाच्या शरीराचे तापमान, ऑक्सिजन पातळी तपासणे, केस कापताना यूज अँड थ्रो अॅप्रन व टॉवेल वापरणे, सुरक्षित अंतराचे पालन करणे अशी काळजी घेत होतो. करोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाउन समजू शकतो, पण त्याचबरोबर सरकारने आम्हाला काही तरी दिलासा दिला पाहिजे किंवा सुरक्षिततेची सर्व काळजी घेऊन व्यवसाय पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली पाहिजे,’ असेही गायकवाड म्हणाले.

सलून व ब्युटी पार्लर व्यावसायिकांच्या संघटनांशी न बोलता सरकारने एकतर्फी बंदी जाहीर केली आहे. या घटकांना कोणताही आर्थिक दिलासा दिलेला नाही. त्यामुळे या निर्णयाचा निषेध असून, ही बंदी तत्काळ उठवावी, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू.

  • रामदास सूर्यवंशी, प्रदेशाध्यक्ष, बारा बलुतेदार विकास संघ

बारा बलुतेदार विकास संघाच्या मागण्या

  • लॉकडाउनच्या काळात दुकानाचे व घराचे भाडे आणि वीजबिल माफ करावे.
  • व्यावसायिकांच्या बँक खात्यात २५ हजार रुपयांची मदत जमा करावी.
  • व्यावसायिकांसाठी विमा व आरोग्य कवच योजना सुरू करावी.
  • आतापर्यंत राज्यात १९ सलून व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत करावी.
  • बारा बलुतेदार आर्थिक विकास महामंडळ आणि आयोग स्थापन करावा.
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments