नागरिकांनी हरकती व सूचना नोंदवून विकास प्रक्रियेत सहभागी व्हावे; उच्चस्तरीय बैठकीत स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांचे आवाहन
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधीपिंपरी-चिंचवड शहराचा नियोजनबद्ध, सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास साधण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या प्रारूप विकास आराखडा (डीपी) २०२६ च्या प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर निगडी प्राधिकरण येथील ग. दी. माडगूळकर प्रेक्षागृहात प्रारूप विकास आराखड्यासंदर्भात उच्चस्तरीय बैठक पार पडली. शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या या आराखड्याबाबत नागरिकांनी सकारात्मक भूमिका घेत हरकती व सूचना नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले.
बैठकीला स्थायी समिती सभापती तथा प्रारूप सुधारित विकास योजना नियोजन समिती सदस्य अभिषेक बारणे, समिती सदस्य संदीप कस्पटे, सारिका गायकवाड, नगररचना विभागाचे उपसंचालक ललित खोब्रागडे, अनुपमा कुलकर्णी, निवृत्त सहसंचालक प्रकाश भुक्ते, उत्तरेश्वर लोंढे, दत्तात्रय पवार तसेच वास्तुरचनाकार व पर्यावरण तज्ज्ञ नथू श्रीपती शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
बैठकीत प्रारूप विकास आराखड्याच्या विविध तांत्रिक बाबींचा आढावा घेण्यात आला. शहराची वाढती लोकसंख्या, औद्योगिक विस्तार, वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा, मलनिसारण, सार्वजनिक सुविधा, हरित क्षेत्र, शिक्षण व आरोग्य सुविधा यांचा विचार करून पुढील वीस वर्षांच्या गरजा लक्षात घेऊन आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
१५ मे २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप विकास आराखड्यावर सध्या नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्याची प्रक्रिया सुरू असून, ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत विविध भागांत सुनावण्या घेण्यात येणार आहेत. नागरिकांच्या सूचना आणि आक्षेपांचा विचार करून अंतिम विकास आराखड्याला स्वरूप दिले जाणार आहे.
या विकास आराखड्यात रुंद रस्ते, डीपी रोड, रिंग रोड, मेट्रो, बीआरटीएस, पदपथ, सायकल ट्रॅक, वाहनतळ, पाणीपुरवठा, वीज उपकेंद्रे, मलनिसारण व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन केंद्रे तसेच ग्रीन बेल्ट, उद्याने आणि नदीकाठाच्या संवर्धनासाठी आवश्यक आरक्षणांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे भविष्यातील विकास अधिक नियोजनबद्ध होण्यास मदत होणार असून नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध होणार आहेत.
यावेळी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे अधोरेखित करण्यात आले.
“आजचे नियोजन म्हणजे उद्याचे सुंदर शहर. प्रारूप विकास आराखड्याबाबत नागरिकांनी आपल्या हरकती आणि सूचना सकारात्मक पद्धतीने मांडून महानगरपालिकेला सहकार्य करावे. नागरिकांच्या सहभागातूनच पिंपरी-चिंचवडचा विकास अधिक नियोजनबद्ध, सुरक्षित आणि सर्वसमावेशक होईल,” असे स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी केले.


