८ फेब्रुवारी २०२१,
पॉप सिंगर रिहानाने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर अनेक सेलिब्रिटजनी ट्विट केलं होतं. सर्व सेलिब्रिटजच्या ट्विटमध्ये साधर्म्य दिसून येत असल्याने याची चौकशी करण्यात येणार असून तसे आदेश देण्यात आल्याचं अनिल देशमुख यांनी आज स्पष्ट केलं. काँग्रेसच्या शिष्टमंडळाची आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सेलिब्रिटीजच्या ट्विटच्या चौकशी करण्याची मागणी केली होती. एकाच वेळी सेलिब्रिटीजने ट्विट करण्यामागचं कारण काय? त्यांच्यावर कुणाचा दबाव होता का? या सेलिब्रिटजचा बोलविता धनी कोण आहे? या सर्व प्रकाराची चौकशी झाली पाहिजे, असं सचिन सावंत यांनी सांगितलं.
झूम मीटिंदरम्यान काँग्रेसकडून सेलिब्रिटींच्या ट्विटचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. सेलिब्रिटींवर दबाव टाकण्याता आला होता याबद्दल माहिती घ्यावी अशी मागणी काँग्रेसने केली. त्यावर अनिल देशमुख यांनी गुप्तहेर विभाग यासंबंधी तपास करणार असल्याची माहिती दिली आहे. यावेळी खासकरुन अक्षय कुमार आणि सायना नेहवालच्या ट्विटचा उल्लेख करण्यात आला. दोन्ही ट्विटमध्ये असणाऱ्या साधर्म्य आश्चर्यकारक असल्याचं सांगण्यात आलं.
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी यासंबंधी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे की, ‘कोणीही व्यक्तिगत पातळीवर मत व्यक्त करत असेल तर त्यावर आक्षेप असण्याचं कारण नाही. पण ट्विटची वेळ, भाषा पाहिली तर हे भाजपाच्या स्क्रिप्टनुसार करण्यात आलं का? याबाबत शंका निर्माण होते. अक्षय कुमार आणि सायना नेहवाल यांच्या ट्विटमधील शब्द समान आहेत. सुनील शेट्टीच्या ट्विटमध्ये भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याचाही उल्लेख आहे. त्यामुळे भाजपाच्या स्क्रिप्टप्रमाणे हे करण्यात आलं का? ही शंका निर्माण होते”.
सावंत यांनी मांडलेले मुद्दे गंभीर असल्याने अनिल देशमुख यांनी त्याची गंभीर दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. सेलिब्रिटीजनी कुणाच्या दबावाखाली ट्विट केलं होतं का? एकाचवेळी ट्विट करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आळा होता का? याची चौकशी होणार आहे. सर्वांच्या ट्विट्समधील साधर्म्यामुळे ही चौकशी होणार असून राज्याच्या गुप्तचर यंत्रणेमार्फत ही करण्याचे आदेश दिल्याचं देशमुख म्हणाले.