गेल्या काही दिवसांपासून राज्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या २०१९ सालच्या पहाटेच्या शपथविधीची नव्याने चर्चा सुरु झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या शिळ्या कढीला पुन्हा ऊत आला होता. अजित पवार आणि मी पहाटे घेतलेल्या शपथविधीबाबत शरद पवार यांना पूर्ण कल्पना होती, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळाला आश्चर्याचा मोठा धक्का बसला होता. मात्र, यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नव्हती.
अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत मौन सोडले आहे. त्यांनी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भात भाष्य केले. पहाटेच्या शपथविधीमुळेच महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट उठली, असे वक्तव्य त्यांनी केले. मात्र, शरद पवार यांच्या या गुगलीमुळे राजकीय वर्तुळात नेहमीप्रमाणे संभ्रम निर्माण झाला आहे. पहाटेच्या शपथविधीबाबत आपल्याला माहिती होती का नव्हती, याबाबत कोणतेही थेट भाष्य न करता शरद पवार बरेच काही बोलून गेले.
यावेळी शरद पवार यांनी म्हटले की, २०१९ साली नेमकं काय झालं? त्यावेळी सरकार बनवण्याचा एक प्रयत्न झाला. त्या प्रयत्नाचा एकच फायदा झाला की, राष्ट्रपती राजवट होती, ती उठली. राष्ट्रपती राजवट उठल्यानंतर काय झालं, हे तुम्ही पाहिलं असेल. पहाटेच्या शपथविधीबाबत तुम्हाला माहिती होती का? अजित पवार यावर काहीच का बोलत नाहीत… ?, असे प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आले. त्यावर शरद पवारांनी म्हटले की, पहाटेच्या शपथविधीबाबत अजित पवारांनी बोलण्याची गरज नाही.काही गोष्टींबाबत तसंही बोलायची आवश्यकता नसते.
पहाटेचा शपथविधी झाला नसता तर महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट उठली असती का? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का, असा प्रतिप्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला. मात्र, शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात पहाटेच्या शपथविधीबाबत नव्याने चर्चा सुरु होण्याची शक्यता आहे. यावर भाजप आणि महाविकास आघाडीचे नेते काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.