पिंपरीः थेरगाव येथील प्रेरणा सहकारी बँकेची 22 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रविवार (28 फेब्रुवारी) रोजी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. कोविड-19 मुळे शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून ही सभा संपन्न झाली. यावेळी सदर कार्यक्रमास बँकेचे अध्यक्ष मा. कांतीलाल तुकाराम गुजर अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तुकाराम गुजर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर कांतीलाल गुजर यांनी दिपप्रज्वलन करून या सभेस सुरूवात झाली. यावेळी बँकेच्या आर्थिक वर्ष 2019-20 च्या अहवालावर चर्चा करण्यात आली.
यावेळी अध्यक्ष कांतीलाल गुजर यांनी बँकेच्या ठेवी 370.08 कोटी तर 202.52 कोटीची कर्जे आणि सीआरएआर 20.69 टक्के इतका असल्याची माहिती दिली. बँकेकडून मोबाईल बँकिंग अॅप, आरटीजीएस, एनइएफटी, बीबीपीएस इत्यादी सुविधा देत असल्याचे सांगितले. आगामी काळात सर्व सभासदांच्या पाठिंब्यावर प्रेरणा बँक उत्कृष्ट कामगिरी करेल, अशी अपेक्षा यावेळी गुजर यांनी व्यक्त केली. सदरच्या सभेत कोविड-19 महामारीच्या काळात अत्यावश्यक सेवेत काम करण्याऱ्या डॉक्टर, नर्सेस, पोलीस तसेच सफाई कामगार यांच्या कामाचे कौतुक करण्यात आले. तसेच या कठीण प्रसंगी बँकेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाख रूपये मदतनिधी तर पीपीई कीट वाटपासाठी पुणे जिल्हा बँक असोसिएशनला एक लाख रूपये धनादेश देण्यात आला.
सदर सभेस बँकेचे उपाध्यक्ष अंकुश पऱ्हाड, संचालक श्रीधर वाल्हेकर, गबाजी वाकडकर, सुरेस पारखी, संजय पठारे, संतोष मुंगसे, संदिप पवार, राजाराम रंदिल, राजेंद्र शिरसाठ, उमेश आगम, सुजाता पारखी, मिना शेळके, तज्ञ संचालक नंदकिशोर तोष्णीवाल, चंद्रभागा भिसे, सभासद तसेच बँकेचे अधिकारी, सेवकवर्ग आदी उपस्थित होते.
बँकेचे संचालक श्रीधर वाल्हेकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. उपाध्यक्ष अंकुश पऱ्हाड यांनी आभार मानले.