मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचा (एमटीएचएल) ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे तसेच महिला सशक्तिकरण अभियानाचे दि. १२ जानेवारी रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. मुख्य कार्यक्रम नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे होणार असल्याने या कार्यक्रमाच्या तयारीची पालकमंत्री उदय सामंत यांनी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासह आज भेट देवून पाहणी केली.
यावेळी आ. प्रशांत ठाकूर, आ. महेश बालदी, विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, पनवेल मनपा आयुक्त गणेश देशमुख यांसह विविध विभागप्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.सामंत यांनी व्यासपीठ, सभा मंडप, लोकप्रतिनिधींची व मान्यवर बैठक व्यवस्था त्याचबरोबर येण्या-जाण्याचा मार्ग, बैठक व्यवस्था, महिलांची बैठक व्यवस्था, आरोग्य व्यवस्था पोलीस बंदोबस्त, वाहतुकीचे नियोजन आदी व्यवस्थेचा आढावा घेतला.
पालकमंत्री श्री सामंत म्हणाले की, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणानी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. यामध्ये कुठल्याही प्रकारच्या उणीवा राहणार नाही याची दक्षता घ्या. कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे. महिलांना कार्यक्रमस्थळी येताना त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. वाहनतळ ते कार्यक्रमस्थळावरील मार्गावर वाहतुकीचे नियोजन व्यवस्थित करण्याबाबतही त्यांनी सूचना केली.
प्रशासनाने केलेल्या नियोजनाची माहिती जिल्हाधिकारी डॉ. म्हसे यांनी यावेळी दिली.