पंतप्रधान नरेंद्र मोदी एक ऑगस्टला पुणे दौऱ्यावर येणार आहेत.
लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार आहे. त्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी एक ऑगस्टला पुणे दौऱ्यावर येणार आहेत.
त्यांच्या कार्यक्रमाचे स्थळ अद्याप निश्चित झालेले नाही. तरी लोहगाव विमानतळापासून शहरात येणाऱ्या मार्गावरील कामे त्वरित बंद करावेत तसेच नवीन कामे काढू नयेत, असे आदेश महापालिकेने काढले आहे. लोकमान्य टिळक पुरस्कार वितरण समारंभानंतर पंतप्रधानांच्या हस्ते पुणे महापालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेतील २ हजार ६५० सदनिकांचा, मेट्रोचे विस्तारीकरण, पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिकेचे काही प्रकल्प याचा शुभारंभ होणार आहे.
मात्र, अद्याप पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचे स्थळ निश्चीत झालेले नाही. पंतप्रधानांची सुरक्षा, त्यांना मोटारीने प्रवास करताना लागणारा कालावधी आणि शहरातील वाहतूक याचा विचार करून ठिकाण ठरवले जात जाणार आहे. असे असले तरी महानगरपालिकेने आता पासूनच दौऱ्याची तयारी सुरू केली आहे.
पुणे महपालिकेसह इतर संस्थांकडून लोहगाव विमानतळ रस्ता, येरवडा, नगर रस्ता, शिवाजीनगर, गणेशखिंड रस्ता, पेठा यासह इतर भागात कोणत्याही स्वरूपाचे खोदकाम करू नये, असे आदेश देण्यात आलेले आहेत. खोदकाम केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, अतिरिक्त आयुक्त यांनी यासंदर्भात बैठक घेऊन आदेश दिल्याचे सांगितले.