मागील अनेक वर्षांपासून पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या पुणे रेल्वे स्टेशनच्या नूतनीकरणाचा प्राथमिक आराखडा अखेर तयार झाला आहे. पुणे रेल्वे स्टेशनवर सध्या होणारी प्रवाशांची गर्दी आणि भविष्यातील विस्तार पाहता जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाणार असून, हा आराखडा लवकरच रेल्वे बोर्डाला पाठविण्यात येणार आहे. सध्याच्या ‘हेरिटेज’ इमारतीचा डामडौल कायम राखून, रेल्वेच्या ताब्यातील जागांचा सुयोग्य वापर करून पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव आहे.
पुणे रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासाची चर्चा अनेक वर्षांपासून आहे. मात्र, त्यासाठी आतापर्यंत फारसे प्रयत्न झाले नव्हते. बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आजूबाजूच्या रेल्वे-एसटी-मेट्रो या सर्व प्रवासी सुविधांचा एकत्रित विचार करून, सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. भविष्यात पुणे स्टेशनवर प्रवासी संख्या किती वाढेल आणि त्यादृष्टीने पार्किंगपासून ते इतर सेवांसोबत ‘मल्टिमोडल इंटिग्रेशन’ अशा विविध मुद्द्यांचा यामध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे. पुणे रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे प्रशानाची विविध ठिकाणी विखुरलेली मोठी जागा आहे. त्याचा वापर करून पुणे रेल्वे स्टेशन अत्याधुनिक व देशातील एक चांगल्या दर्जाचे स्टेशन बनविण्यासाठी प्रयत्न करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. हा आराखडा इंजिनीअरिंग विभाग आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपासून तो रेल्वे बोर्डाला सादर करणार आहे.
जुन्या इमारतीचे होणार जतन
पुणे रेल्वे स्टेशन येथील इमारत हेरिटेज म्हणून ओळखली जाते. पुणे रेल्वे स्टेशनची इमारत १९२५मध्ये उभारण्यात आली. त्यामुळे या इमारतीचे जतन केले जाणार आहे. त्याला कोणत्याही प्रकारचा धक्का लावला जाणार नाही. या इमारतीच्या पुढे रेल्वे स्टेशनचा विकास केला जाणार आहे. हेरिटेज इमारतीमध्ये पुण्याच्या संस्कृतीचे जतन केले जाणार आहे.
अशा असतील प्रवाशांसाठीच्या सुविधा
- पुण्याची संस्कृती व वारसा जपणारी स्टेशनची अत्याधुनिक इमारत.
- रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजूला इमारत उभारून दोन्ही बाजूचे एकत्रिकरण.
- रिटेलसाठी स्वतंत्र जागा, कॅफेटेरिया, दोन्ही बाजूला करमणूक सुविधा.
- स्टेशनमध्ये आगमन व निर्गमनसाठी स्वतंत्र मार्ग.
- प्रवाशांसाठी आधुनिक सुविधांसह प्रतीक्षालय.
असे असेल नवीन रेल्वे स्टेशन
- नवीन स्टेशनची मुख्य इमारत : १२ हजार ९७६ चौरस मीटर.
- दुसरी स्टेशन इमारत : तीन हजार ३३४ चौरस मीटर.
- प्रस्तावित स्टेशनचे आकारमान : २६ हजार ६१० चौरस मीटर.
- पार्किंगसाठी जागा : तीन हजार ३०० चौरस मीटर.
- पार्सलसाठी स्वतंत्र इमारत.
- नवीन इमारत ग्रीन बिल्डिंग प्रमाणपत्र असलेली.
- मेट्रो, बस स्थानक आणि रेल्वे स्टेशनसह मल्टिमोडल एकत्रिकरण