Monday, June 15, 2026
Homeआरोग्यविषयकपैशांअभावी गर्भवती महिलेचा मृत्यू; दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाविरोधात गंभीर आरोप

पैशांअभावी गर्भवती महिलेचा मृत्यू; दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाविरोधात गंभीर आरोप

पुण्यातील नावाजलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तनिषा सुशांत भिसे (वय ३०) असे मृत महिलेचे नाव असून, रुग्णालय प्रशासनाने दहा लाख रुपयांची मागणी करत तिला उपचार नाकारल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे पुणेकरांमध्ये संतापाची लाट उसळली असून, रुग्णालयाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

नेमके काय घडले?

तनिषा भिसे यांना प्रसूतीच्या कळा सुरू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी तातडीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालय प्रशासनाने उपचार सुरू करण्याआधी दहा लाख रुपयांची मागणी केली. कुटुंबीयांनी तातडीने अडीच लाख रुपये भरायला तयार असल्याचे सांगितले, पण तरीही रुग्णालयाने तिला दाखल करून घेण्यास नकार दिला.

कुटुंबीयांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाशी संपर्क साधला. भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या तिच्या पतीनेही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मदतीची विनंती केली. मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे रामेश्वर नाईक यांनी देखील रुग्णालयाशी संपर्क साधला, पण रुग्णालय प्रशासनाने कोणतीही मदत करण्यास नकार दिला.

अखेर तनिषा भिसे यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, हलवताना त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला. दुसऱ्या रुग्णालयात पोहोचल्यावर तनिषा यांनी जुळ्या बाळांना जन्म दिला, पण त्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली.

रुग्णालय प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

या घटनेनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप होत असून, ‘रुग्णाच्या जीवापेक्षा पैसा महत्त्वाचा का?’ असा सवाल उपस्थित केला जात आहे. पुण्यातील सर्वोत्तम वैद्यकीय सुविधांसाठी प्रसिद्ध असलेल्या रुग्णालयाने अशा प्रकारे व्यवहार केल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.

आमदार अमित गोरखे यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

या घटनेबाबत भाजप आमदार अमित गोरखे यांनी मुख्यमंत्र्यांकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. “रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एका कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. अशा रुग्णालयांवर कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments