Tuesday, January 13, 2026
Homeअर्थविश्ववाल्हेकरवाडीत सत्तासंघर्षाला धार ! प्रभाग १७ मध्ये घराणेशाही, प्रतिष्ठा आणि नव्या चेहऱ्यांची...

वाल्हेकरवाडीत सत्तासंघर्षाला धार ! प्रभाग १७ मध्ये घराणेशाही, प्रतिष्ठा आणि नव्या चेहऱ्यांची हाय-व्होल्टेज लढत

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या रणांगणात प्रभाग क्रमांक १७ (वाल्हेकरवाडी) हा सध्या शहराचा मुख्य केंद्रबिंदू ठरला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपताच येथील राजकीय चित्र अधिकच रंजक झाले असून, जुने विरुद्ध नवे, स्थानिक घराणी विरुद्ध नवोदित चेहरे असा थेट सत्तासंघर्ष पाहायला मिळणार आहे. चिंचवडे, भोईर आणि वाल्हेकर या मातब्बर घराण्यांसह सर्वच प्रमुख राजकीय पक्षांची प्रतिष्ठा या प्रभागात पणाला लागली आहे.

निवडणूक प्रशासनाने जाहीर केलेल्या अंतिम यादीतून ‘अ’, ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ या चारही जागांवर वेगवेगळ्या स्वरूपाच्या चुरशीच्या लढती रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘अ’ जागा : अनुसूचित जाती महिला – वादाच्या भोवऱ्यात लढत

‘अ’ जागेवर अनुसूचित जाती महिला आरक्षण असल्याने आशा ज्ञानेश्वर सूर्यवंशी (भाजप) विरुद्ध सामाजिक कार्यकर्ते राजेश आरसुळ यांच्या पत्नी मनिषा राजेश आरसुळ (राष्ट्रवादी काँग्रेस) असा सामना रंगणार आहे. नुकताच भाजपात प्रवेश करून आशा सूर्यवंशी यांना उमेदवारी मिळाली असली तरी, भाजपातील अनुसूचित जातीतील जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे चित्र आहे. तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या आरोपांमुळे संघ परिवारातही अस्वस्थता असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीमधील मनिषा राजेश आरसुळ यांना संधी उपलब्ध झाली असून वाल्हेकरवाडीतील मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात, याकडे विशेष लक्ष लागले आहे.

‘ब’ जागा : दिग्गजांची प्रतिष्ठेची लढाई

‘ब’ जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे भाऊसाहेब सोपानराव भोईर विरुद्ध भाजपचे नामदेव जनार्दन ढाके अशी तगडी लढत होणार आहे. मागील निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्याची संधी भोईरांना मिळणार का, की ढाके पुन्हा बाजी मारणार, याचा फैसला १६ जानेवारीला होणार आहे.

‘क’ जागा : वाल्हेकर आडनावामुळे मतदारांमध्ये संभ्रम

‘क’ जागेवर वाल्हेकर आडनावाच्या तीन महिला उमेदवार रिंगणात असल्याने मतदारांमध्ये मोठी चुरस आणि संभ्रम निर्माण झाला आहे. येथे मतविभाजनाचा फटका कोणाला बसतो, हे निकालावेळी स्पष्ट होईल.

‘ड’ जागा : चिंचवडे विरुद्ध चिंचवडे – हाय व्होल्टेज सामना

‘ड’ जागेवर चिंचवडे शेखर बबन (राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध चिंचवडे सचिन बाजीराव (भाजप) असा थेट सामना होणार असून, ही लढत शहरातील सर्वात ‘हाय-व्होल्टेज’ लढतींपैकी एक ठरण्याची शक्यता आहे.

यावेळी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (दोन्ही गट), काँग्रेस यांच्यासह आम आदमी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीनेही तगडे उमेदवार दिल्याने वाल्हेकरवाडीत बहुरंगी आणि अटीतटीची निवडणूक रंगणार आहे.

I’m अंतिम उमेदवारांची यादी जाहीर झाल्याने आता प्रचाराचा जोर वाढणार असून, वाल्हेकरवाडीतील सुज्ञ जनता कोणाच्या पारड्यात मत टाकते, यावरच निकालाचे गणित अवलंबून आहे. हा बालेकिल्ला कोण सर करतो, याकडे संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments