Friday, September 11, 2026
Homeआरोग्यविषयकशहरात खड्डे बुजविण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू; २,१६४ तक्रारींपैकी १,६०९ खड्डे बुजविले

शहरात खड्डे बुजविण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू; २,१६४ तक्रारींपैकी १,६०९ खड्डे बुजविले

प्रत्येक प्रभागात स्वतंत्र पथके; तक्रारी मिळताच तातडीने कार्यवाही

पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची मोहीम महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागामार्फत वेगाने सुरू आहे. नागरिक, लोकप्रतिनिधी आणि विविध माध्यमांतून येणाऱ्या तक्रारींची तातडीने दखल घेतली जात आहे. संबंधित क्षेत्रीय कार्यालयामार्फत पाहणी करून आवश्यकतेनुसार खड्डे बुजविण्याचे काम केले जात आहे. शहरात रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत आतापर्यंत २,१६४ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी १,६०९ खड्डे बुजविण्यात आले आहेत. उर्वरित ५५५ खड्ड्यांची दुरुस्ती सुरू आहे.

महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागामार्फत शहरातील विविध रस्त्यांची देखभाल आणि दुरुस्ती केली जाते. खड्ड्यांबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित क्षेत्रीय कार्यालयाचे पथक त्या ठिकाणी जाऊन पाहणी करते. खड्ड्याचा आकार, खोली, रस्त्याची स्थिती, वाहतुकीची वर्दळ आणि पावसाची परिस्थिती याचा विचार करून दुरुस्तीसाठी योग्य साहित्य निवडले जाते. त्यानंतर खड्डा बुजवून कामाची नोंद केली जाते.

यामध्ये तक्रार प्राप्त → ठिकाणाची पाहणी → खड्ड्याची स्थिती तपासणी → योग्य साहित्याची निवड → खड्डा बुजविणे → कामाची पाहणी व नोंद, अशा पद्धतीने ही कार्यवाही केली जात आहे. आतापर्यंत बुजविण्यात आलेल्या १,६०९ खड्ड्यांपैकी ५५६ खड्डे कोल्ड मिक्स, २३ बीबीएम, ७५४ जीएसबी, १२० पेव्हिंग ब्लॉक आणि १५६ खड्डे काँक्रिटच्या माध्यमातून बुजविण्यात आले आहेत.

प्रत्येक प्रभागात स्वतंत्र पथके कार्यरत

शहरातील प्रत्येक प्रभागात खड्डे बुजविण्यासाठी स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या पथकांना आवश्यक साहित्य, साधनसामग्री, मनुष्यबळ आणि स्वतंत्र वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ही पथके प्रमुख तसेच अंतर्गत रस्त्यांची पाहणी करून आढळणारे खड्डे तातडीने बुजवित आहेत. सध्या पावसाळा सुरू असल्याने डांबर प्लांट बंद आहे. त्यामुळे कोल्ड मिक्स, बीबीएम, जीएसबी, पेव्हिंग ब्लॉक आणि काँक्रिट यांचा वापर करून खड्डे बुजविण्यात येत आहेत. मात्र, सततच्या पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यांवर पुन्हा पाणी साचते. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात बुजविलेले काही खड्डे पुन्हा खराब होण्याची शक्यता असते. अशा ठिकाणी परिस्थितीनुसार पुन्हा दुरुस्ती केली जात आहे.

पावसाची उघडीप मिळताच कायमस्वरूपी दुरुस्ती

पावसाची मोठी उघडीप मिळाल्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती अधिक प्रभावीपणे करण्याचे नियोजन महानगरपालिकेने केले आहे. पावसाळ्यात रस्ते आणि डांबराचे साहित्य ओलसर असल्याने डांबरीकरणासाठी आवश्यक गुणवत्ता मिळत नाही. त्यामुळे सध्या नागरिकांची गैरसोय कमी करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. पावसाळा संपल्यानंतर डांबर प्लांट सुरू झाल्यावर पावसाळ्यात तात्पुरती दुरुस्ती केलेल्या ठिकाणांची पुन्हा पाहणी केली जाईल. आवश्यकतेनुसार या ठिकाणी कायमस्वरूपी डांबरीकरण करण्यात येणार आहे. तसेच दोषदायित्व कालावधी लागू असलेल्या रस्त्यांवर खड्डे पडल्यास संबंधित ठेकेदारामार्फतच दुरुस्ती करून घेण्यात येणार आहे. दुरुस्ती करण्यास टाळाटाळ करणाऱ्या ठेकेदारांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

पावसाची तीव्रता आणि सातत्याने होणाऱ्या पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यांवर पुन्हा पाणी साचून तात्पुरत्या स्वरूपात बुजविलेले खड्डे खराब होत आहेत. नागरिकांची गैरसोय कमी करण्यासाठी उपलब्ध साहित्याच्या माध्यमातून खड्डे बुजविण्याचे काम वेगाने सुरू आहे. पावसाची मोठी उघडीप मिळाल्यानंतर दुरुस्तीची कामे अधिक प्रभावीपणे केली जातील. तसेच पावसाळ्यानंतर डांबर प्लांट सुरू झाल्यावर आवश्यक त्या ठिकाणी कायमस्वरूपी डांबरीकरण करण्यात येईल.

– प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याबाबत संबंधित यंत्रणांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. प्राप्त तक्रारींचे वेळेत निराकरण करण्याची जबाबदारी संबंधित कार्यकारी अभियंत्यांची आहे. विभागप्रमुखांनी या कामावर नियमित नियंत्रण ठेवण्याबाबत तसेच तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या अभियंत्यांविरुद्ध नियमानुसार कारवाई प्रस्तावित करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. 

– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments