आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकाराने दोन नावांची चर्चा; अभिषेक बारणे की संदीप कस्पटे ?
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी राजकीय घडामोडींना वेग आला असून आमदार शंकर जगताप यांनी पुढाकार घेतल्यामुळे दोन नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपचे नगरसेवक अभिषेक बारणे आणि संदीप कस्पटे यांच्यापैकी एकाला अध्यक्षपदाची संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थायी समितीत भाजपचे स्पष्ट बहुमत असल्यामुळे अध्यक्ष भाजपचाच होणार हे जवळपास निश्चित मानले जाते. समितीतील १६ सदस्यांपैकी ११ सदस्य भाजपचे आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ आणि शिवसेनेचा १ सदस्य आहे.
महापौर पद भोसरी मतदारसंघाला आणि उपमहापौर पद पिंपरी मतदारसंघाला मिळाल्यामुळे सत्ता संतुलन राखण्यासाठी स्थायी समिती अध्यक्षपद चिंचवड मतदारसंघाकडे जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
अभिषेक बारणे हे थेरगाव प्रभागातून निवडून आले आहेत, तर संदीप कस्पटे हे पिंपळे निलख-वाकड परिसराचे प्रतिनिधित्व करतात. दोन्ही नेत्यांचे स्थानिक राजकारणात स्वतंत्र वजन असल्यामुळे अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


