Friday, June 13, 2025
Homeताजी बातमीगणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांची नियमावली जाहीर; बाॅक्स कमानी, ध्वनिवर्धकाचे निर्बंध कायम

गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांची नियमावली जाहीर; बाॅक्स कमानी, ध्वनिवर्धकाचे निर्बंध कायम

वैभवशाली परंपरा असलेला गणेशोत्सव यंदा करोनाच्या दोन वर्षांच्या निर्बंधानंतर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. पोलिसांकडून उत्सवासाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तालयात पार पडलेल्या बैठकीत मंडळाच्या कार्यकर्त्यांशी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. उत्सव शांततेत तसेच उत्साहात पार पाडण्यासाठी पोलिसांनी नियमावली केली असून मंडळांना देण्यात येणाऱ्यापरवान्यांसाठी विविध पोलीस ठाण्यात एक खिडकी योजना राबविण्यात येणार आहे.

गेले दोन वर्ष उत्सवावर करोना संसर्गामुळे निर्बंध होते. संसर्गाला अटकाव घालण्यासाठी घालण्यात आलेल्या नियमावलीचे पालन करुन उत्सव साजरा करण्यात आला होता. यंदाचा उत्सव जल्लोषात साजरा करण्याचा निर्णय मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतला असून त्यादृष्टीने कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केली आहे. पोलीस आयुक्तालयात बुधवारी मंडळाच्या कार्यकर्त्यांसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त डाॅ. जालिंदर सुपेकर, रामनाथ पोकळे, राजेंद्र डहाळे, नामदेव चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, सुनील रासने, श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाचे प्रसाद कुलकर्णी, श्री गुरूजी तालीम मंडळाचे प्रवीण परदेशी, श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे विकास पवार, नितीन पंडीत, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचे कार्याध्यक्ष पुनीत बालन तसेच धीरज घाटे, भाऊ करपे, प्रमोद कोंढरे, ऋग्वेद निरगुडकर, सुनील पांडे, विश्वास भोर, बाळासाहेब मारणे, भूषण पंड्या आदी उपस्थित होते.

या बैठकीत पोलिसांनी मंडळांना उत्सव शांततेत तसेच नियमांचे पालन करुन साजरा करण्याचे आवाहन केले. मंडळांसाठी तयार करण्यात आलेली नियमावली जाहीर करण्यात आली. मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सूचना मांडल्या. मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या मागणीवर पोलिसांकडून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन पोलीस आयुक्त गुप्ता यांनी केले.

उत्सवाच्या कालावधीत राज्य तसेच परराज्यातून मोठ्या संख्येने भाविक येतात. मंडपाच्या परिसरात कार्यकर्त्यांनी सुरक्षाविषयक उपाययोजना करणे गरजेचे आहे. मंडपाच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. संशयास्पद व्यक्ती तसेच बेवारस वस्तू आढळल्यास त्वरीत पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकांना त्वरीत मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

प्रत्येक मंडळाला दोन कमानींची परवानगी

मंडळांना कमानींवर लावण्यात येणाऱ्या जाहीरातीतून उत्पन्न मिळते. प्रत्येक मंडळांना दोन बाॅक्स कमानी उभारता येईल. बाॅक्स कमानींची उंची २० फुटापेक्षा जास्त नसावी. मंडपापासून शंभर फुटांच्या आत कमानी असाव्यात तसेच कमानींचा जमिनीपासून दहा फुटापर्यंतचा भाग खुला असावा. सुरक्षेसाठी पोलिसांकडून कमानींची तपासणी करण्यात येणार आहे.

चार दिवस रात्री बारापर्यंत ध्वनिवर्धक

मंडळांनी उत्सवाच्या कालावधीत ध्वनिवर्धकाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या नियमावलींचे पालन करणे गरजेचे आहे. ध्वनिवर्धकाचा आवाज मर्यादित असावा. उत्सवाच्या कालवधीत ४ सप्टेंबर (गौरी पूजन), ६ सप्टेंबर (सातवा दिवस), ८ सप्टेंबर (नववा दिवस) तसेच ९ सप्टेंबर रोजी अनंत चर्तुदशीच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीवर्धकास परवानगी देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments