शहरातील अवैध धंद्यांविरुद्ध पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने चिखली येथील ‘आदित्य लॉज’वर धाड टाकून कुंटणखान्याचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ९ पीडित महिलांची सुटका केली असून, यामध्ये बांगलादेशातून तस्करी करून आणलेल्या एका तरुणीचाही समावेश आहे.
नेमकी घटना काय?
चिखली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील देहू-आळंदी रोडवर असलेल्या ‘आदित्य लॉज’मध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. १३ एप्रिल २०२६ रोजी रात्री ११:३१ च्या सुमारास पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की, आरोपींनी एका तरुणीला बांगलादेशातून बेकायदेशीरपणे भारतात आणून या व्यवसायात ढकलले होते. पोलिसांनी या तरुणीला तिच्या मायदेशी परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
आरोपींवर कठोर कारवाई
या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे:
१. सुदर्शन पवार (लॉज चालक, रा. मुंबई)
२. नाना बोराटे (जागा मालक, रा. पुणे)
३. अशोक बाबर (लॉज मॅनेजर, रा. चिखली) – अटक
४. साहील ऊर्फ शाहीन मंडल (लॉज मॅनेजर, रा. पश्चिम बंगाल)
५. अकिबुल मुल्ला (लॉज कामगार, वय २२) – अटक
चिखली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि पिटा (PITA) कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
२०२६ मधील पोलिसांची कामगिरी
पिंपरी-चिंचवड अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने २०२६ या वर्षात आतापर्यंत ११ ठिकाणी (७ मसाज पार्लर आणि ४ हॉटेल) छापे टाकले आहेत. या मोहिमेत एकूण ३१ आरोपींना अटक करण्यात आली असून २८ पीडित महिलांची यशस्वी सुटका करण्यात आली आहे.
यांनी केली कारवाई
ही धडक कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते, विकास राऊत, वैशाली शेंडगे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. आगामी काळात अशा कारवाया अधिक तीव्र केल्या जातील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.


