Wednesday, November 11, 2026
Homeमुख्यबातम्यापिंपरी-चिंचवड महापालिकेत पोलिसांची दडपशाही..? आंदोलकांशी गैरवर्तन; सर्वसामान्य नागरिकांचीही प्रवेशद्वारावर अडवणूकI

पिंपरी-चिंचवड महापालिकेत पोलिसांची दडपशाही..? आंदोलकांशी गैरवर्तन; सर्वसामान्य नागरिकांचीही प्रवेशद्वारावर अडवणूकI

आयुक्त भेटण्यासाठी वेळ देत नसल्याने ‘आप’चे आंदोलन; शहरातील विविध प्रश्नांसह महापालिकेतील कथित भ्रष्टाचाराविरोधात आवाज बुलंद; आंदोलकांची कॉलर पकडल्याचा आरोप, दोन कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात!

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील विविध नागरी प्रश्न, महापालिकेतील कथित भ्रष्टाचार आणि प्रशासनाच्या कारभाराविरोधात आम आदमी पार्टीच्या (आप) वतीने महापालिका मुख्यालयात आंदोलन करण्यात आले. महापालिका आयुक्तांची भेट घेऊन शहरातील प्रश्न मांडण्यासाठी वारंवार प्रयत्न करूनही आयुक्तांकडून भेटीसाठी वेळ दिला जात नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. प्रशासनाकडून नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत आपच्या कार्यकर्त्यांनी आयुक्त कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली.

‘या आयुक्तांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय!’ अशा घोषणांनी महापालिका परिसर दणाणून गेला. आंदोलनादरम्यान परिस्थिती तणावपूर्ण बनली. पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन आंदोलकांना ताब्यात घेतले.

आंदोलकांची कॉलर पकडल्याचा आरोप; पोलिसांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह!

आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांशी अयोग्य पद्धतीने वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका आंदोलकाची कॉलर पकडून त्याला बाहेर नेण्यात आल्याचे दृश्य समोर आले आहे. आंदोलनकर्त्यांना अशा प्रकारे वागणूक देणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांशी पोलिसांनी संयमाने वागणे अपेक्षित असल्याची भूमिका आंदोलकांनी मांडली.

सर्वसामान्य नागरिकांचीही प्रवेशद्वारावर अडवणूक!

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र, या बंदोबस्ताचा फटका महापालिकेत कामानिमित्त आलेल्या सर्वसामान्य नागरिकांनाही बसला. नागरिकांना प्रवेशद्वारावरच अडवण्यात आल्याने सुरक्षारक्षक आणि नागरिकांमध्ये वादावादी झाली. महापालिकेत आपल्या कामासाठी आलेल्या नागरिकांना प्रवेश नाकारण्याचे कारण काय, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला.

शहरातील प्रश्नांवर आयुक्तांना भेटणेही कठीण?

पिंपरी-चिंचवड शहरात रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, नागरी सुविधा यांसह विविध प्रश्नांवर नागरिकांकडून सातत्याने तक्रारी केल्या जातात. या प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि महापालिकेतील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर जाब विचारण्यासाठी आंदोलक आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, आयुक्त भेटीसाठी वेळ देत नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.

शहरातील नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संघटनांना आयुक्तांची भेट मिळणे अपेक्षित असताना, भेटीसाठी वेळच मिळत नसेल तर नागरिकांनी आपले प्रश्न मांडायचे कुणाकडे, असा प्रश्न या आंदोलनाच्या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

एकीकडे शहरातील प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन सुरू असताना दुसरीकडे आंदोलकांवरील पोलीस कारवाई आणि सर्वसामान्य नागरिकांची झालेली अडवणूक यामुळे महापालिका परिसरातील वातावरण चांगलेच तापले.

टीप : या प्रकरणासंदर्भात पोलिसांची अधिकृत बाजू तसेच पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त कार्यालयाची प्रतिक्रिया मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, बातमी प्रसिद्ध होईपर्यंत दोन्हींकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया प्राप्त झालेली नाही. संबंधितांची बाजू प्राप्त झाल्यास तीही प्रसिद्ध करण्यात येईल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments