२३ ऑक्टोबर २०२०,
मुंबईत रोजगार देण्याच्या बहाण्याने उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या तरुणींना मुंबईत आणून त्यांना देहव्यापाऱ्याच्या दलदलीत ढकलणाऱ्या रॅकेटचा मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. संकेतस्थळावरून चालणारा देहव्यापार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी चार दलालांना अटक केली, तर चार तरुणींची सुटका केली.
दहिसर परिसरात राहणारा एक तरुण संकेतस्थळ चालवत असून त्या आधारे देहव्यापार करीत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट आठच्या पथकाला मिळाली. पोलिसांच्या कारवाई अडकले जाऊ नये, यासाठी हा तरुण व्हॉट्सअॅपवर तरुणींचे फोटो पाठवत असल्याचे समजले. त्यानुसार प्रभारी पोलिस निरीक्षक अजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक महेश तोगरवाड, सहायक निरीक्षक मनोहर कारंडे यांच्यासह रवींद्र माने यांच्या पथकाने या तरुणाच्या हालचालीवर लक्ष केंद्रीत केले. ग्राहक बनून या तरुणाशी संपर्क साधला. त्याने पाठविलेली एक तरुणी निवडली. त्यानुसार कांदिवली येथील एका हॉटेलमध्ये या तरुणीला पाठविण्यात आले. तिच्याकडे चौकशी केल्यानंतर या रॅकेटचा भंडाफोड झाला. हे रॅकेट चालविणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली असून मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहे.