Tuesday, February 11, 2025
Homeगुन्हेगारीपुणे शहरातील कोरेगाव पार्क, बंडगार्डन रस्त्यावरील दोन हुक्का पार्लरवर पोलिसांची कारवाई

पुणे शहरातील कोरेगाव पार्क, बंडगार्डन रस्त्यावरील दोन हुक्का पार्लरवर पोलिसांची कारवाई

शहरातील बेकायदा हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेने छापे टाकले. बंडगार्डन रस्त्यावरील राजा बहाद्दुर मिल परिसर तसेच कोरेगाव पार्क भागातील दोन हुक्का पार्लरवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी हुक्कापात्र, सुगंधी तंबाखू असा मुद्देमाल जप्त केला. हुक्का पार्लर चालविणाऱ्या हाॅटेल मालकांसह व्यवस्थापकाविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.

शहरातील अवैध धंद्यांवर पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. मुंबईतील कमला मिल परिसरात झालेल्या दुर्घटनेनंतर राज्य शासनाने हुक्का पार्लरवर बंदी घातली आहे. आदेश धुडकावून शहरातील काही हाॅटेल चालक बेकायदा हुक्का पार्लर चालवित असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकांनी कारवाई केली. कोरेगाव पार्क भागातील गेरा लिजंट या इमारतीत राॅक वाॅटर नावाच्या हाॅटेलमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याचे आढळून आल्यानंतर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला.

या कारवाईत हुक्कापात्र, सुगंधी तंबाखू असा २१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी हाॅटेल व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक अश्विनी पाटील, अनिकेत पोटे, अजय राणे, अण्णा माने, मनीषा पुकाळे, प्रमोद मोहिते, पुष्पेंद्र चव्हाण आदींनी ही कारवाई केली.

बंडगार्डन रस्त्यावरील राजा बहाद्दुर मिलच्या आवारात हाॅटेल ‘ड्रामा ९’ या हाॅटेलमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर अमली पदार्थविरोधी पथकाने छापा टाकला. या कारवाईत हुक्कापात्र, सुगंधी तंबाखू असा ५२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी हाॅटेल मालकासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, प्रवीण उत्तेकर, संदीप शिर्के, मारुती पारधी, सुजित वाडेकर आदींनी ही कारवाई केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments