संत ज्ञानेश्वर, जगतगुरु संत तुकाराम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले पिंपरी चिंचवड शहर आज सांस्कृतिक व साहित्य नगरी म्हणून ओळखली जाते.या शहरातील साहित्य चळवळ अधिक गतीने पुढे नेणारे, या शहराला साहित्य उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहचवणारे, साहित्य क्षेत्रात मराठीतील मातृसंस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ८४ शाखामध्ये पिंपरी चिंचवड शाखेला महाराष्ट्राच्या नकाशावर अग्रक्रमावर नेणारे, शाखेच्या माध्यमातून शहरात सर्वाधिक साहित्यिक उपक्रम राबवून संस्थेला महाराष्ट्रातील उत्कृष्ठ शाखा करंडक मिळवून देऊन पिंपरी चिंचवड शहरातील साहित्य क्षेत्राला गौरव प्राप्त करुन देणारे, श्री रांजन लाखे या प्रभावी साहित्यिक व्यक्तिमत्वाचे नाव शहरातील प्रत्येक साहित्यिकाच्या हृदयात आदरपूर्वक विराजमान आहे.
आज महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडचे नाव महाराष्ट्राच्या साहित्य नकाशावर दिमाखाने झळकवण्यात राजन लाखे यांचा सिंहाचा वाटा आहे.पिंपरी चिंचवड शहरात २०१६ साली संपन्न झालेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने साहित्य क्षेत्रात एक नवी भरारी तर साहित्यिकांमध्ये एक नवा उत्साह निर्माण करण्याचे महत्वपूर्ण काम केले . सदर संमेलनात राजन लाखे यांनी कविकट्टा प्रमुख या नात्याने त्यांच्या सहकार्याच्या मदतीने संमेलनतील कविकट्टाचे शिस्तबद्ध नियोजन करुन कविकट्टा मध्ये १०२४ कवींना संधी देऊन साहित्य क्षेत्रात एका नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यावेळी त्यांची अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे विश्वस्त म्हणून निवड झाली त्याचप्रमाणे महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड चे अध्यक्ष म्हणून दुसर्यांदा निवड होऊन आज ते महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड च्या अध्यक्षपदाची धुरा जबाबदारीने व यशस्वीपणे सांभाळीत आहेत.
१) ८९ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कविकट्टाच्या अतुलनीय कामगिरीची दखल घेऊन, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने पुढे २०१७ ते २०२१ अशा प्रत्येक वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कविकट्टा प्रमुख म्हणून त्यांची निवड केली. आजपर्यंत प्रत्येक अ. भा. मराठी साहित्य संमेलनतील कविकट्याचे शिस्तबद्ध नियोजन करुन कवींना सन्मान प्राप्त करुन देणारी सुलभ निवड पद्धत विकसित करुन कविकट्टा म्हणजे दर्जेदार कविता सादर होणारे व्यासपीठ* अशी मान्यता मिळवून दिली इतकेच नव्हे तर कविकटट्याला संमेलनाचे मुख्य आकर्षण केंद्र बनवले.
२) कविकटट्यावर या सलग सहा वर्षाच्या कामगिरीची ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डसने दखल घेऊन नोंद केली आणि राजन लाखे यांना सन्मानाने मानपत्र व रेकॉर्ड चे सुवर्ण पदक देउन नाशिक येथे गौरविण्यात आले.
३) साहित्य क्षेत्राच्या इतिहासात प्रथमच साहित्यिकांची आरोग्य तपासणी हा उपक्रम राबवून राजन लाखे एक नवीन पर्व सुरु केले.
४) संध्यानंद या दैनिक वृत्तपत्रात २०१३ पासून दर रविवारी मनातले माझ्या या सदरातून आजतागायत म्हणजे २०२२ पर्यंत सातत्याने सलग ९ वर्षे लेखन करुन राजन लाखे यांनी एक विक्रम प्रस्थापित केला आहे.
५) पिंपरी चिंचवड शहरात ११ वर्षापुर्वी प्रथमच काव्यपहाट हा उपक्रम सुरु करुन प्रात:काली कविंचा सन्मान करण्याचा मान त्यांनी प्राप्त केला आहे.
६) मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून राजन लाखे यांनी पिंपरी चिंचवड शहरात ७ वर्षापुर्वी चळवळ सुरु केली. त्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांना निवेदन, प्राध्यापकांचा परिसंवाद, पंतप्रधानांना साहित्यिकांची व मराठी माणसाची १०००० पत्रे, सह्यांची मोहीम करुन केंद्रिय सांस्कृतिक मंत्र्यास निवेदन, आदि अभियान त्यांनी राबवले आहेत आणि त्याचा पाठपुरावा अजुनही करत आहेत.
७) अशा विविध स्तरावर साहित्य क्षेत्रात कार्य करत असताना असंख्य नवोदित कवी व लेखकांना त्यांनी व्यासपीठ मिळवून दिले आहे हे विशेष.
श्री राजन लाखे यांच्या ग्रंथसंपदा मध्ये वास्तवरंग फुलताना, मी पाहिलेला सुर्य, सौंदर्याच्या गर्भातून, *मनातले माझ्या, *मन माझे मी मनाचा, असे ५ काव्यसंग्रह, नुकताच प्रकाशित झालेला गुंता हा ललितलेखसंग्रह, तर बहरला गुलमोहर, जगण्यात मजा आहे, तरुणाईचे नवे तराणे या भावगीतांच्या ध्वनीफितींचा समावेश आहे.
राजन लाखे यांना साहित्य क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय कामगिरी मुळे अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. सध्या राजन लाखे हे अष्ठपैलू व्यक्तिमत्व शांताबाई शेळके यांच्या जन्मताब्दी निमित्त* त्यांना मानवंदना म्हणून साहित्य क्षेत्रासहीत विविध क्षेत्रातील १०० मान्यवरां कडून शांताबाईं च्या आठवणी व त्यांच्याच कवितेतून त्यांना मानवंदना असा न भूतो ना भविष्यति, वर्षभर चालणारा अभिनव आणि भव्य प्रकल्प राबवित आहेत.असा उपक्रम आजपर्यंत झालेला नसून साहित्य क्षेत्राच्या इतिहासात याची नोंद असेल अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे व इतर मान्यवरांनी दिली आहे यावरुन त्यांच्या कार्याची कल्पना येईल.
श्री राजन लाखे हे साहित्य क्षेत्रात मानाचे स्थान असणार्या अक्षरवेध या दिवाळी अंकाचे संपादक असून सदर दिवाळी अंकाने साहित्य क्षेत्रात उत्कृष्ठ अंक म्हणून पुरस्कार प्राप्त केलाआहे.अभियांत्रिकी क्षेत्रातील पदव्युत्तर तर विधी क्षेत्रात पदवीधर असणार्या कवी लेखक राजन लाखे यांनी साहित्य क्षेत्रात केलेल्या व करत असलेल्या असामान्य कार्यांमुळे NEWS 14 तर्फे त्यांची निवड झाली असून त्यांना पिंपरी चिंचवड सन्मान या पुरस्काराने गौरवण्यात येत आहे ही आनंददायी बाब आहे.राजन लाखे यांचे हार्दिक अभिनंदन व त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी NEWS 14 तर्फे शुभेच्छा.
दरम्यान पद्मश्री गिरीश प्रभूणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या ” पिंपरी चिंचवड सन्मान ” ( सन्मान कार्याचा – गौरव शहराचा ) पुरस्कार सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड चे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील आणि पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आदी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक अविनाश कांबीकर यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
कार्यक्रमाची माहिती ” पिंपरी चिंचवड सन्मान” ‘सन्मान कार्याचा – गौरव शहराचा’ कोठे पार पडणार, स्थळ ;- ऑटो क्लस्टर हॉल चिंचवड पुणे -१९ दिनांक आणि वेळ गुरुवार ७ एप्रिल २०२२, सायंकाळी ५ वाजता..