Sunday, August 16, 2026
Homeगुन्हेगारीपीएमआरडीएची मोई येथे आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई;  ३५ हेक्टर क्षेत्रावरील ६८० अनधिकृत पत्राशेड...

पीएमआरडीएची मोई येथे आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई;  ३५ हेक्टर क्षेत्रावरील ६८० अनधिकृत पत्राशेड जमीनदोस्त

पुणे | प्रतिनिधी :

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) खेड तालुक्यातील मोई येथे अनधिकृत बांधकामांविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करत तब्बल ६८० अनधिकृत पत्राशेड जमीनदोस्त केली. सलग दोन दिवस चाललेल्या या धडक मोहिमेत सुमारे ३५ हेक्टर क्षेत्रावरील बेकायदेशीर पत्राशेड हटविण्यात आली. या कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, प्रशासनाने बेकायदेशीर बांधकामांविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

ही कारवाई पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या नेतृत्वाखाली तसेच अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी आणि पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली १३ व १४ जुलै रोजी राबविण्यात आली. कोणतीही कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने अत्यंत सूक्ष्म नियोजन केले होते.

या मोहिमेसाठी १,००० हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी, एमएसएफचे जवान आणि सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते. तसेच पीएमआरडीए, पिंपरी-चिंचवड पोलीस, महावितरण, आरोग्य विभाग आणि खेड पंचायत समिती यांच्यातील उत्कृष्ट समन्वयामुळे ही मोठी कारवाई शांततेत आणि सुरळीत पार पडली.

या धडक कारवाईमुळे पीएमआरडीए हद्दीतील अनधिकृत पत्राशेडधारक आणि बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, प्रशासनाने अशा प्रकारच्या बांधकामांवर यापुढेही कठोर कारवाई सुरू ठेवण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे.

याबाबत महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले की, पीएमआरडीएच्या हद्दीत बेकायदेशीर पत्राशेड किंवा कोणतेही अनधिकृत बांधकाम खपवून घेतले जाणार नाही. नागरिकांनी अशा अनधिकृत बांधकामांच्या आमिषाला बळी पडू नये. आगामी काळातही अशा धडक कारवाया सातत्याने सुरू राहणार आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments