पद्मश्री पेटकर आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा न्यूज १४ मिडीया नेटवर्कने केला गौरव
पिंपरी चिंचवड शहराची जागतिक स्थरावर स्वतंत्र नविन ओळख निर्माण होण्यासाठी आणखी पायाभूत सेवासुविधा उभारण्यात येत आहेत. लवकरच शहरामध्ये हॉकी, कयाकिंग, कुस्ती, कबड्डी, प्रस्तरारोहण अशा विविध खेळांच्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. तसेच पिंपरी चिंचवड राहण्यायोग्य शहर व्हावे यासाठी आणि २०३० मध्ये होणा-या ऑलिंम्पिक स्पर्धांमध्ये पिंपरी चिंचवडला पदक मिळाले पाहिजे या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले. गुरुवारी (दि. ७ एप्रिल) ‘न्यूज १४ मिडीया नेटवर्क’च्या वतीने ऑटो क्लस्टर हॉल चिंचवड येथे आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात राजेश पाटील बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री गिरीश प्रभूणे होते. यावेळी प्रमुख पाहुणे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर आयोजक अविनाश कांबीकर, चित्रपट दिग्दर्शक अर्जुन गुजर आदी उपस्थित होते.
यावेळी राजेश पाटील, मेघराजराजे भोसले , भाऊसाहेब भोईर ,पद्मश्री गिरीष प्रभुणे यांच्या हस्ते पॅरालिम्पिक जलतरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांना ‘पिंपरी चिंचवड सन्मान जीवन गौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. तसेच डॉ. पं. नंदकिशोर कपोते (नृत्य), राजन लाखे (साहित्य), डॉ. संजीवकुमार पाटील (नाट्य), राजेंद्र शिंदे (चित्रपट), डॉ. नरेंद्र वैद्य (वैद्यकीय), धनंजय वर्णेकर (शैक्षणिक), मानव कांबळे (सामाजिक), संतोष बारणे (बांधकाम व्यावसायिक), अनिल सौंदडे (औदयोगिक), दिलीप सोनिगरा (सुवर्णपेढी व्यावसायिक), अनिता गोसावी (कर्तृत्ववान महिला) यांना " पिंपरी चिंचवड सन्मान" सन्मान कार्याचा गौरव शहराचा’ हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. तसेच ६ मे २०२२ रोजी प्रदर्शित होणा-या "लगन" या मराठी चित्रपटाचे पोस्टरचे अनावरण करण्यात आले.
यावेळी राजेश पाटील म्हणाले की, कला, सांस्कृतिक क्षेत्र हे त्या शहराचा आत्मा असतो. पुणे शहराची जशी सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख आहे. तशीच कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात पिंपरी चिंचवड शहराची स्वतंत्र ओळख निर्माण होण्यासाठी आगामी काळात काम केले जाईल. पिंपरी चिंचवड शहर हे २५ लाख लोकसंख्ये पेक्षा जास्त आणि राज्यात ५ व्या क्रमाकांचे शहर आहे. या शहराचा सर्वांगिण विकास होण्यासाठी आपल्या कला, संस्कृती, साहित्याचे जतन आणि संवर्धन केले पाहिजे. त्याचा उत्सव केला पाहिजे. यासाठी एक स्वतंत्र व्यासपीठ निर्माण करण्याची गरज आहे असेही राजेश पाटील यांनी सांगितले.
पद्मश्री गिरीष प्रभुणे यावेळी म्हणाले की, अविनाश कांबीकर यांनी विविध क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तींना एकत्रित करुन आयोजित केलेल्या या सन्मान सोहळ्यामुळे पिंपरी चिंचवड शहराचा तोंडावळा समाजा पुढे आला आहे. स्वागत प्रास्ताविक अविनाश कांबीकर, सुत्रसंचालन अक्षय मोरे आणि आभार विशाल पवार यांनी मानले.