पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, पिंपरी प्रभाग क्रमांक २१ मध्ये एक गंभीर आणि धक्कादायक घटना घडली आहे. भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या घरात जबरदस्तीने घुसून धिंगाणा घातल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत घरातील सदस्यांना अश्लील शिवीगाळ, मारहाण तसेच ३३ वर्षीय डॉक्टर महिलेचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप असून, याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
ही घटना रात्री सुमारे १२.१५ वाजण्याच्या सुमारास पिंपरी गावात घडली. तक्रारीनुसार, प्रचार आटोपून तक्रारदार महिला रात्री दहा वाजता घरी परतल्या होत्या. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी एकत्र येऊन घरात घुसले. स्वप्नील वाघेरे याने परवानगीशिवाय घरात प्रवेश करत तक्रारदार महिलेच्या चुलत सासऱ्यांना अश्लील शिवीगाळ केली. “आमच्या विरोधात उमेदवार उभा करण्याचं धाडस केलंस, जीवे मारून टाकू,” अशी धमकीही देण्यात आली.
तक्रारीत नमूद केल्यानुसार, आरोपींनी डॉक्टर महिलेला अश्लील शिवीगाळ करत तिचा विनयभंग केला. तसेच तिच्या दिराला धक्काबुक्की करण्यात आली, आजीसासूंना ढकलण्यात आले आणि दुचाकी वाहनांचे नुकसान करून परिसरात दहशत निर्माण करण्यात आली.
या प्रकरणी स्वप्नील वाघेरे, सूरज वाघेरे, सागर वाघेरे, सिद्धार्थ वाघेरे, वरुण जगताप, प्रशांत वाघेरे, सारंग वाघेरे यांच्यासह अन्य काही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हे विरोधी पॅनलमधील भाजप उमेदवार उषा संजोग वाघेरे यांचे समर्थक व कार्यकर्ते असल्याचे पोलीस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेमुळे शहरातील राजकीय वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले असून, पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.


