पिंपरी, ता.7: राज्यातील अनेक ठिकाणी कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. मुंबई, पुणे यासारख्या ठिकाणी कोरोनाचा उद्रेकच पाहायला मिळत आहे. यामुळे राज्य शासनाने 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लादले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनानेही महापालिका क्षेत्रात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वप्रकारची दुकाने 30 एप्रिलपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या याच निर्णयाविरोधात येथील व्यापारी रस्त्यावर उतरले आहेत. पिंपरीतील साई चौकात व्यापा-यांनी या निर्णयाचा विरोध करत निदर्शने केली.
शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी 7 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला पिंपरी-चिंचवड शहरातील व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध असून रस्त्यावर उतरून आपली नाराजी व्यक्त केली आहे.

दुकाने तब्बल महिनाभर बंद ठेवण्यास सांगितल्याने व्यापारी चिंतेत आहेत. तसेच दुकाने बंद केल्यामुळे दुकानाचे भाडे, बँकांचे हप्ते, कामगारांचा पगार, वीज बील हे सर्व कसे भरणार, असा सवाल व्यापा-यांकडून उपस्थित केला जात आहे. आम्ही कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करतो. त्यामुळे आम्हाला दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी आणि हा लॉकडाउन मागे घ्यावा, अशी मागणी व्यापा-यांकडून केली जात आहे.