मुख्यमंत्र्यांच्या घोषणेची अंमलबजावणी होण्यापूर्वीच पालिकेने पाच कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
यशवंतराव चव्हाण स्मारक समितीच्या वतीने निगडीत उभारण्यात येणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांच्या स्मारकाला निधीची आवश्यकता असल्याने हा निधी राज्याच्या नगरविकास विभागामार्फत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या घोषणेची अंमलबजावणी होण्यापूर्वीच पालिकेने पाच कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारच्या मंजुरीनंतरच हा निधी स्मारक समितीला देण्यात येणार आहे. निगडी प्राधिकरणात यशवंतराव चव्हाण स्मारक समितीच्या माध्यमातून स्मारक उभारण्यात येत आहे. ४४ गुंठे जागेत स्मारक, ग्रंथालय, वाचनालय, गोरगरीब व अनाथ मुलांसाठी अभ्यासिका वसतिगृह, वधू-वर सूचक केंद्र, विद्यार्थी मार्गदर्शन केंद्र, वैद्यकीय उपचार केंद्र, सांस्कृतिक भवन, व्यायामशाळा बांधण्याचे नियोजन आहे.
या स्मारकाचे तिसऱ्या मजल्याचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत आहे. संपूर्ण बांधकामासाठी अंदाजे २० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. महापालिकेने यापूर्वी पाच कोटींचे अनुदान दिले आहे. भाजपच्या चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांनी स्मारकासाठी पाच कोटींचा निधी देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. यावर शिंदे यांनी नगरविकास विभागाकडून पाच कोटी देण्यात येतील, अशी घोषणा केली होती. मात्र, पालिकेने निधी देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हा निधी देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर पाच कोटी रुपये हे वर्ग करून स्मारक समितीला निधी देण्यात येणार आहे.