पिंपरी डेअरी फार्म येथे रेल्वे उड्डाणपूल उभारण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने संरक्षण विभागाच्या जागेवरील १४२ झाडे ताेडण्यात येणार आहेत. या झाडांच्या बदल्यात संरक्षण विभागाला नऊ लाख रुपये देण्यात येणार आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत पिंपरी डेअरी फार्म येथे रेल्वे फाटकाच्या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यास सुरुवात केली आहे. या पुलामुळे पुणे मुंबई रस्त्याकडून पिंपरीगावात जाण्यासाठी अस्तित्वात असणारे मुंबई पुणे रेल्वे मार्गावरील रेल्वे फाटक बंद होऊन नागरिकांच्या प्रवासाच्या वेळेत, इंधनात बचत होणार आहे. रेल्वे उड्डाणपूल हा संरक्षण खात्याच्या अखत्यारीत असलेल्या जागेवर करावा लागत आहे. संरक्षण खात्याची जागा महापालिकेस हस्तांतरित करणे तसेच त्यांच्याकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेण्यात आले आहे.
या पुलासाठी २४ हजार ११९.२६ चाैरस मीटर क्षेत्र महापालिकेस हस्तांतरित करण्यात आले आहे. याबाबतचा पिंपरी-चिंचवड महापालिका व भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय यांच्यामध्ये करार झाला आहे. पुलाला अडथळा ठरणारी झाडे ताेडण्यासाठी वृक्ष प्राधिकरण समितीची मान्यता घेण्यात आली आहे. या १४२ झाडांचे पुण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडून मुल्यांकन ठरवून घेण्यात आले आहे. त्यानुसार संरक्षण विभागाने महापालिकेकडे ८ लाख ९४ हजार ९२२ रुपयांची मागणी केली आहे. त्यामुळे हे पैसे अदा करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.