महापालिकेच्या वतीने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षांसाठी अर्थसंकल्प तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी नागरिकांनी दहा लाखांपर्यंतची कामे सुचविण्याचे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.
महापालिकेच्या वतीने सन २००७-०८ पासून अर्थसंकल्पात नागरिकांनी सुचविलेल्या कामांचा समावेश केला जातो. त्यानुसार नागरिकांनी त्यांच्या क्षेत्रीय कार्यालय किंवा प्रभागातील कामे सुचवावी. गरजेनुसार आवश्यक व योग्य कामांचा समावेश अर्थसंकल्पात करण्यात येतो. पदपथ, सायकल मार्ग, रस्ता डांबरीकरण, रस्ता दुभाजक, दुरुस्ती, बसस्थानक, माहितीफलक, नामफलक, बैठक व्यवस्था, रस्त्यावरील दिवे, वाहतूक दिवे, इमारत दुरुस्ती, सार्वजनिक वाचनालय, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्मशानभूमी, विर्सजन घाट, आरोग्य निरीक्षक केबिन, शौचालय, मुतारी, कचराकुंड्या अशी कामे नागरिकांनी सुचवावीत. सूचना अर्ज १० नोव्हेंबर २०२३ पर्यंत संबंधित क्षेत्रीय कार्यालय किंवा इ-मेलवर स्वीकारण्यात येणार आहेत.
संबंधित क्षेत्रीय अधिकारी व कार्यकारी अभियंता हे सुचविलेल्या कामांची शहानिशा करून विकासकामांचा समावेश अर्थसंकल्पात करतील. अर्थसंकल्पासाठी चांगल्या कामांची सूचना पाठवावी, असे आवाहन आयुक्त सिंह यांनी केले आहे. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. दहा लाख खर्चापर्यंतची कामे नागरिकांना सुचविता येणार आहेत. पूल, उड्डाणपूल, नवीन रस्ते, भवन, बांधकाम अशी मोठी कामे सुचविता येणार नाहीत. कामाचे स्वरूप आणि स्थान अचूकपणे लिहावे. कामानुसार अर्जातील रकाने भरावे. अर्ज भरण्याआधी क्षेत्रीय कार्यालय किंवा सारथी हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.