पुरोगामी आणि प्रतिगामी असे दोन टोकाचे विचार असलेले दोन राजकीय पक्ष दोन तारखेला सत्तेसाठी राज्यात एक झाले. त्यानंतर या गलिच्छ राजकारणाचा निषेध म्हणून मनसे
ने त्याविरोधात गेले तीन दिवस राज्यभर एक सही संतापाची ही मोहीम घेतली.त्यात पिंपरी-चिंचवडमध्ये हजारो नागरिकांनी सध्याच्या राज्यातील राजकारणावर संताप व्यक्त करीत सह्या केल्या.
मनसे
अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने एक सही संतापाची ही मोहीम घेण्यात आली. सध्याच्या राजकारणावर जनतेत असलेला राग तथा चीड आपल्या माध्यमातून व्यक्त करून घेत त्याचा आगामी निवडणुकीत लोकांपर्यत पोचण्यासाठी ही मोहीम मनसेने राबविल्याचे समजते. त्यातून प्रकट झालेल्या जनतेच्या संतापाकडे मनसे राज्य सरकारचे लक्ष वेधणार आहे. त्यासाठी जमा झालेल्या राज्यातील लाखो सह्यांचे प्रदर्शन मुंबईत शिवाजी पार्कवर प्रदर्शन भरविणार असल्याचे या पक्षाचे पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक सचिन चिखले यांनी आज सरकारनामाला सांगितले.
ही मोहीम प्रदर्शन ८, ९ आणि १० जुलै असे तीन दिवस शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघात तेथील मुख्य चौकात घेण्यात आली. त्यात हजारो नागरिकांनी सहभाग नोंदवला. त्यांनी राज्यातील राजकारणावरील संताप सह्या करून व्यक्त केला.
विशिष्ट विचारधारेतून प्रत्येक नागरिक मतदान करीत असतो. परंतू, हे मतदान केलेले राजकीय पक्ष ही विचारधाराच सत्तेसाठी गुंडाळून ठेवतात, हे क्लेषदायक आहे, असे चिखले म्हणाले. ज्या अपेक्षेने त्यांना निवडून दिलेले असते, ते काम होताना दिसत नाही. बेरोजगारी, महागाई, महिलांवरील वाढत्या अत्याचाराकडे ते दुर्लक्ष करतात. वाढत्या गुन्हेगारीमुळे महाराष्ट्राचा बिहार होत चालला आहे, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.
राजकारणाचा चिखल झाला आहे का? या घटनांचा तुम्हाला राग येत नाही का? असा प्रश्न उपस्थित करून ‘एक सही संतापा’ची करा, असे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात येत होते. त्यात मुलभूत गरजांकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याची भावना सह्या करणाऱ्या अनेकांनी व्यक्त केली. मतदानाचा हक्क बजावतो कशासाठी आणि पदरात पडतेय काय, असा त्रागाही काहींनी बोलून दाखवला. शहरातील मनसेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मोहिमेत सहभागी झाले होते.