पिंपरी चिंचवड शहर भाजपचे प्रदेश प्रवक्ते तसेच माजी सत्तारूढ पक्षनेते आणि माजी शहराध्यक्ष एकनाथ पवार यांनी भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा देत असल्याची माहिती आज रविवारी (दि २२) रोजी पिंपरीतील पत्रकार परिषदेत दिली आहे. तसेच पुढील राजकीय वाटचालीची माहिती येत्या शुक्रवारी (दि. २७) रोजी देणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
राज्यातील मराठा आरक्षणासाठी भाजपच्या वेळकाढूपणाचे कारण देत त्यांनी सदस्यत्वाचा तसेच प्रदेश प्रवक्ते पदाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना एकनाथ पवार यांनी पत्र पाठविले असून, त्यात त्यांनी म्हटले आहे की, ”आज खूप जड अंतकरणाने मी हा निर्णय घेत आहे, गेली 40 वर्षे ज्या पक्षात काम केलं, घडलो त्या भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसेच प्रदेश प्रवक्ते पदाचा राजीनामा देत आहे.
गेली अनेक वर्षे राज्यातील मराठा बांधव आरक्षण मागत असताना त्यांना हे सरकार आरक्षण देऊ शकत नाही, समाज अत्यंत आशेने या सरकारकडे पाहत असताना देखील केवळ वेळकाढूपणा सुरू आहे. त्या सरकारच्या पक्षात शांत बसून राहण्यापेक्षा मी माझ्या भाजपा प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा देत असून आजपासून मी पक्षापासून मुक्त होत आहे”, असे या पत्रात पवार यांनी म्हटले आहे.