Monday, October 7, 2024
Homeताजी बातमीपिंपरी-चिंचवड पोलिसांना मिळाला बाप्पाचा 'हा' अनोखा प्रसाद ..

पिंपरी-चिंचवड पोलिसांना मिळाला बाप्पाचा ‘हा’ अनोखा प्रसाद ..

पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील ३९४ पोलिसांना गणपती पावला आहे. गणरायाच्या आगमनाच्या दिवशी ३९० जणांना पोलीस शिपाई, नाईकपदावरुन हवालदार, तर चार अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती मिळाली आहे. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी प्रसृत केले.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला पाच वर्षे झाले तरी मनुष्यबळाची कमतरता आहे. पोलीस शिपाई पदासाठी दोनवेळ्या भरती झाली. इतर जिल्ह्यांतून बदलीवर येणारे, पोलीस भरतीमधून मिळालेल्या पोलिसांची मोट बांधून आयुक्तालयाचा गाडा हाकला जात आहे. विविध सण, अतिमहत्वांच्या नेत्यांच्या दौ-यावेळी आयुक्तालयाला बाहेरून अधिकची कुमक मागवावी लागते. बंदोबस्तासह घडणाऱ्या गुन्ह्यांच्या तपासासाठी देखील राखीव मनुष्यबळ ठेवावी लागते.

त्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी ३९४ जणांना बढती दिली. पोलीस दलात २५ मे २००४ पूर्वी रुजू झालेल्यांना सेवाज्येष्ठतेनुसार बढती मिळाली आहे. पोलीस शिपाई आणि नाईक पदावरून ३९० जणांना हवालदारपदी, तर पोलीस दलात ३० वर्षे सेवा पूर्ण करणारे, सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर किमान तीन वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या चार जणांना पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती दिली आहे. मनोज बनसोड, ज्ञानेश्वर पोटे, वाहतूक शाखेतील गजेंद्र जाधवर आणि वाकड पोलीस ठाण्यातील अरुण भालेराव यांना ही बढती मिळाली आहे.

पोलीस नाईक पद रद्द

पोलिसांना पदोन्नती साखळीमध्ये सामान्यतः पोलीस शिपाई-पोलीस नाईक-पोलीस हवालदार-सहायक पोलीस उपनिरीक्षकासह तीन पदोन्नतीच्या संधी मिळतात. सर्वसाधारपणे एका पदावर दहा वर्षे सेवा कालावधी झाल्यानंतर पदोन्नती मिळते. पोलीस शिपाई पदावर भरती झालेल्यांना पोलीस उपनिरीक्षक होण्यासाठी वयाच्या अडचणी येतात. त्यामुळे त्यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न अपूर्णच राहते. त्यासाठी पोलीस दलातील पदोन्नती साखळीतील पोलीस नाईक हे पद गृह विभागाने रद्द केले. सध्या कार्यरत असलेले पोलीस शिपाई, नाईक या दोन्ही संवर्गातील पोलिसांना हवालदार पदावर बढती दिली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments