Tuesday, April 21, 2026
Homeअर्थविश्वपिंपरी-चिंचवड पोलिसांची थरारक कामगिरी,  खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण करणाऱ्या टोळीला फिल्मी स्टाईलने ठोकल्या बेड्या

पिंपरी-चिंचवड पोलिसांची थरारक कामगिरी,  खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण करणाऱ्या टोळीला फिल्मी स्टाईलने ठोकल्या बेड्या

पुण्यातील रहाटणी परिसरातून एका व्यापाऱ्याचे ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करून त्यांना उत्तर प्रदेशकडे नेणाऱ्या पाच सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या खंडणी विरोधी पथक, गुंडा विरोधी पथक आणि काळेवाडी पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी मोठ्या धाडसाने पाठलाग करून संगमनेर टोलनाका येथे सापळा लावून अपहरण केलेल्या व्यक्तीची सुखरूप सुटका केली.

नेमकी घटना काय?

९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७:१५ च्या सुमारास रहाटणी येथील शिवराज नगरमध्ये ही घटना घडली. तक्रारदाराचे भाऊ (व्यापारी) यांना ५ अज्ञात इसमांनी काळ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून (क्र. UP-70-R-9272) जबरदस्तीने पळवून नेले. अपहरणकर्त्यांनी ५० लाख रुपयांची मागणी केली आणि पैसे न दिल्यास त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

असा लावला पोलिसांनी छडा

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा आणि काळेवाडी पोलिसांची विविध पथके तपासासाठी रवाना झाली. सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल क्रमांकाच्या तांत्रिक विश्लेषणावरून आरोपींचे लोकेशन अहमदनगरच्या दिशेने असल्याचे समजले.

खंडणीसाठी आरोपींचे सतत फोन येत असल्याने पोलिसांनी जाळे विणले. आरोपींनी खंडणीची रक्कम घेण्यासाठी आळेफाटा येथे बोलावले होते. मात्र, आरोपी वारंवार जागा बदलत होते. अखेर खंडणी विरोधी पथक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (संगमनेर विभाग) यांच्या मदतीने संगमनेर टोलनाका येथे सापळा रचून आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

अटक केलेले आरोपी:

१. चंद्रशेखर दिपचंद गौड (वय ३४, रा. आजमगड, यु.पी.)

२. दिलीप मोहनलाल सरोज (वय २८, रा. प्रतापगड, यु.पी.)

३. रिंकू अलगुराम सरोज (वय २०, रा. प्रतापगड, यु.पी.)

४. अनिल गिरधारीलाल सरोज (वय २६, रा. प्रतापगड, यु.पी.)

५. मुकेशकुमार राममुरत चमार (वय २४, रा. प्रतापगड, यु.पी.)

तसेच, माहिती पुरवणारा स्थानिक आरोपी संतान सुरेश चव्हाण (वय ३५, रा. काळेवाडी) यालाही पोलिसांनी अटक केली आहे.

काय मुद्देमाल हस्तगत केला?

पोलिसांनी आरोपींकडून खालील मुद्देमाल जप्त केला आहे:

• दोन देशी बनावटीची पिस्तूल आणि ६ जिवंत काडतुसे.

• एक काळ्या रंगाची स्विफ्ट कार.

• ५ मोबाईल फोन आणि ७ लाख रुपये किमतीचे घड्याळ.

• एकूण जप्त मुद्देमाल: १८,२८,००० रुपये.

पोलिस पथकाचे कौतुक

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त वसंत तेली यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक, गुंडा विरोधी पथक आणि काळेवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. गुन्हेगारांच्या तावडीतून व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केल्यामुळे सर्वत्र पोलिसांचे कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments