पुण्यातील तळेगावच्या जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे.
तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे (Kishor Aware) यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी माजी नगरसेवक भानू खळदे (Bhanu Khalde) याला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या (Pimpri Chinchwad Police) गुंडा स्कॉड पथकाने नाशिक येथून ताब्यात घेतले आहे. गेली दिड महिने मास्टरमाईंड भानू खळदे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोलीसांना गुंगारा देत होता. अखेर गुंडा स्कॉडच्या पथकाने या आरोपीला जेरबंद केलं. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या आवारात किशोर आवारे यांच्यावर पिस्तूलनं गोळ्या झाडून तसेच कोयत्यानं वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती.
किशोर आवारे प्रकरणातील मुख्य संशयित असलेला माजी नगरसेवक भानू खळदे हा फरार होता. अखेर त्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. प्राथमिक तपासात भानू खळदे याचा मुलगा गौरव खळदे याचा खुनात सहभाग असल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडे चौकशी केली होती. यावेळी सदर गुन्ह्याच्या कटकारस्थानात भानू खळदे याचा सहभाग असल्याची माहिती पुढे आली होती. मात्र भानूच्या अटकेनं खऱ्या अर्थानं या खुनाचे गुड उकलणार आहे.
काय घडलं हत्येच्या दिवशी?
किशोर आवारे यांनी मार्च महिन्यात सोमटणे टोल नाका बंद करण्यासाठी आमरण उपोषण केलं होतं. त्या दरम्यानच मावळवासीयांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन करत, टोल नाक्यावर मोर्चा धाडला होता. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री स्वतः या आंदोलनस्थळी आले होते. त्यानंतर हा टोल नाका बंद करण्याच्या दृष्टीने पावलं उचलण्यास सुरुवात झाली होती. मात्र किशोर आवारे यांचा निर्घृण खून करण्यात आला. आवारे नगरपरिषद कार्यालयात गेले होते. त्यावेळी हल्लेखोर कार्यालयाबाहेर दबा धरून बसले होते. ते बाहेर येताच हल्लेखोरांनी त्यांच्या दिशेने गोळीबार करत कोयत्याने वार देखील केले. आवारे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता. आवारे यांच्यावर नेमका कोणी आणि का हल्ला केला, या शोध पिंपरी चिंचवड पोलिसांकडून सुरू होता. अखेर पोलिसांच्या तपासाला यश आलं असून किशोर आवारे यांच्या हत्येचा मुख्य आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
भानू खळदे आणि किशोर आवारेंमध्ये आधीपासूनच वाद
किशोर आवारे यांनी माजी नगरसेवक भानू खळदे यांच्याविरोधात वृक्षतोड केल्याची तक्रार केली होती, यावरुन भानू खळदे आणि किशोर आवारेंमध्ये डिसेंबर महिन्यात खडाजंगी झाली होती आणि त्यावेळी आवरेंनी खळदेंच्या कानशिलात लगावली होती. जुन्या नगरपरिषदेत सर्वांसमोर झालेल्या या अपमानाचा बदला घेण्यासाठी खळदे बापलेकाने किशोर आवारेंच्या हत्येचा कट रचला आणि अखेर 12 मे रोजी कामकाज सुरू असलेल्या नगरपरिषद कार्यालयासमोरच त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. भानू खळदे त्यानंतर फरार झाला असून दोन पथकं त्याचा शोध घेत होती. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी हल्लेखोरांना 24 तासांच्या आत बेड्या ठोकल्या आणि त्यांची कसून चौकशी केली असता भानू खळदेचा मुलगा गौरव खळदेच्या सांगण्यावरून हत्या केल्याचं तपासात समोर आलं. तिसऱ्या दिवशी गौरवला अटक केल्यानंतर पुढील चौकशीत वडील भानू खळदेच या हत्येचा मास्टरमाईंड असल्याचं तपासात निष्पन्न झालं. त्यानुसार पिंपरी चिंचवड पोलिसांनी भानू खळदेला आरोपी केलं आणि त्याचा शोध सुरू केला.