Tuesday, April 21, 2026
Homeअर्थविश्वपिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीत विविध विकासकामांना हिरवा कंदील

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीत विविध विकासकामांना हिरवा कंदील

छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरण, सीसीटीव्ही देखभाल, पाणीपुरवठा व विद्युत कामांसह अनेक प्रस्तावांना मंजुरी

पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकासकामांसह पाणीपुरवठा, विद्युत देखभाल, सीसीटीव्ही यंत्रणांची दुरुस्ती तसेच विविध विभागांशी संबंधित खर्चाच्या प्रस्तावांना आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात ही बैठक पार पडली. स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, नगरसचिव मुकेश कोळप, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर यांच्यासह स्थायी समिती सदस्य आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत शहरातील विविध विकासकामांशी संबंधित विषयांवर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली. स्थापत्य विभागामार्फत प्रभाग क्रमांक २ मधील PIECC परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळा परिसराचे सुशोभीकरण व कलात्मक कामे करण्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली. तसेच या परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई तसेच एआर-व्हीआर तंत्रज्ञानाचा वापर करून विद्युत विषयक कामे करण्यासाठीच्या प्रस्तावालाही हिरवा कंदील देण्यात आला.

याशिवाय यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, महापालिकेच्या शाळा, प्रशासकीय इमारती तसेच शहरातील विविध प्रभागांमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणांच्या वार्षिक देखभाल व दुरुस्ती कामांसाठीच्या निविदांनाही स्थायी समितीने मंजुरी दिली. तसेच पाणीपुरवठा यंत्रणा, पंपहाऊस, ट्रान्सफॉर्मर आणि विद्युत यंत्रणांशी संबंधित विविध कामांसाठी येणाऱ्या खर्चासही मान्यता देण्यात आली.

महापालिकेच्या विविध इमारती, शाळा व दवाखान्यांमधील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करण्याच्या कामास मुदतवाढ देण्यासही बैठकीत मंजुरी देण्यात आली. तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या फरक रकमेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी महापालिकेच्या वाट्याचा निधी अग्रिम स्वरूपात देण्यासही स्थायी समितीने मान्यता दिली.

यावेळी शहरातील पायाभूत सुविधा व प्रशासनाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करून आवश्यक निर्णय घेण्यात आले. तसेच स्थायी समिती सदस्यांच्या उपसूचनांसह महापालिकेच्या अंदाजपत्रकासही बैठकीत मान्यता देण्यात आली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments