पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आठ क्षेत्रिय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रामधील रस्त्यांवरील खड्डे दुरूस्तीसाठी विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये १ वाहन, २ मजूर आणि दुरूस्तीकामी आवश्यक असणाऱ्या बांधकाम साहित्याचा समावेश आहे. सदर विशेष पथके पावसाळ्याच्या कालावधीमध्ये आठवड्यातील सर्व दिवस तैनात ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिली आहे.
चिखली सोनवणे वस्ती रस्ता, तळवडे रूपीनगर मुख्य रस्ता, टॉवर लाईन रस्ता, चिखलीगाव रस्ता, चिखली मोरेवस्ती येथे वाघु साने चौक ते चिंचेचा मळा रस्ता, मुकाई चौक ते किवळे गावात जाणारा रस्ता तसेच पुनावळे अंडरपास ते गायकवाड नगर आणि कोयते वस्ती येथील रस्त्यावरील बुजविलेल्या खड्ड्यांची पाहणी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केली. पाहणी दरम्यान रस्त्यांवर आढळलेले विविध ठिकाणचे खड्डे तातडीने दुरूस्त करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या, तसेच पावसाळ्यानंतर रस्त्याचे खड्डे डांबराने किंवा कोल्डमिक्स पध्दतीने भरून घ्यावेत असे निर्देशही दिले.
यावेळी सह शहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे, कार्यकारी अभियंता अनिल शिंदे, देवान्ना गट्टूवार, उप अभियंता शालीग्राम अंदुरे उपस्थित होते.
महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये खड्डे बुजविण्याचे काम विशेष पथकांकडून सुरू आहे. नागरिकांकडून तक्रार मिळताच खड्डे बुजविण्याचे काम तात्काळ पुर्ण केले जाईल, अशी माहिती सह शहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे यांनी दिली आहे.