पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूकसाठीच्या प्रारूप प्रभागनिहाय मतदार यादीचे काम पूर्ण झाले आहे. प्रभागरचनेस राज्य निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाल्यानंतर ही प्रभागनिहाय मतदार यादी अंतिम केली जाणार आहे. प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा जाहीर केल्यानंतर प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेस दिले होते. त्यासाठी पिंपरी,चिंचवड,भोसरी विधानसभा मतदार संघातील मतदारांच्या मूळ याद्या व पुरवणी यादी वापरून कामकाज करण्यात आले आहे. कर्मचार्यांना मतदार यादी बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.एका कर्मचार्यास मतदार यादीच्या सहा भागांची जबाबदारी होती. त्यानुसार कर्मचार्यांनी नवीन प्रभागात त्या-त्या मतदारांची नावे आहेत की नाही हे तपासले. त्यांच्या नोंदी निवडणूक आयोगाने दिलेल्या कंट्रोल चार्ट तसेच, एमएस एक्सेलमध्ये भरण्यात आल्या. ते काम पूर्ण झाले आहे.
पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीच्या प्रारुप प्रभागरचनेवरील हरकतींवर प्राधिकृत अधिकाऱ्यांमार्फत सुनावणी झाली. सुनावणीनंतर आवश्यक शिफारशींसह अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे महापालिकेने सादर केला आहे. त्यामुळे आता अंतिम प्रभागरचना आणि आरक्षण सोडत जाहीर कधी होणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्य निवडणुक आयोगाच्या सूचनेनुसार महापालिकेची प्रारूप रचना 1 फेब्रुवारीला जाहीर करण्यात आली होती. १४ फेब्रुवारीपर्यंतच्या कालावधीत यावर ५ हजार ६८४ हरकती प्राप्त झाल्या. या हरकतींवर २५ फेब्रुवारी रोजी प्राधिकृत अधिकारी राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्या उपस्थितीत सुनावणी झाली. सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकारी कवडे यांच्या शिफारशीसह अहवाल पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक विभागाने आयोगाला सादर केला.


