सात दिवस रंगणार ‘अभिजात मराठी’चा सांस्कृतिक महोत्सव, साहित्य, नाट्य, संगीत आणि लोककलेचा जागर; पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा विशेष सन्मान
मराठी भाषेला मिळालेल्या ‘अभिजात’ दर्जाचा गौरव आणि मराठी भाषेचे संवर्धन, प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस’ आणि ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’ला आजपासून उत्साहात सुरुवात होत आहे. ३ ते ९ ऑक्टोबरदरम्यान शहरातील विविध नाट्यगृहे आणि सभागृहांमध्ये साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी नागरिकांना अनुभवता येणार आहे.
या सप्ताहाचे उद्घाटन आज दुपारी ३ वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होणार आहे. यावेळी सुप्रसिद्ध ज्येष्ठ संगीतकार पद्मश्री पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मानपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात येणार आहे. त्यानंतर ‘गाणी मंगेशकरांची’ हा त्यांचा विशेष सांगीतिक कार्यक्रम होणार आहे.
सनई, हलगी, संबळ आदी पारंपरिक वाद्यांच्या निनादात सकाळी १० वाजता सप्ताहाचा शुभारंभ होणार असून, त्यानंतर वैशाली पळसुले आणि सहकाऱ्यांचा ‘गणेश वंदना, कथक व लावणीची जुगलबंदी’, तसेच मोरया थिएटर्सचा ‘अंतर्नाद – अ जर्नी टू दी सोल’ हा नाट्य-संगीतमय आविष्कार सादर होणार आहे. रात्री अशोक हांडे प्रस्तुत ‘मंगलगाणी दंगलगाणी’ या संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदाच्या सप्ताहात साहित्यिक चर्चा, परिसंवाद, कवी संमेलन, कथाकथन, अभिवाचन, नाटके, एकांकिका, बालनाट्य, गझल, लावणी, शाहिरी पोवाडे, लोककला आणि सांगीतिक कार्यक्रम अशा विविध कलाप्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, आचार्य अत्रे रंगमंदिर, नटसम्राट निळूफुले नाट्यगृह, चिखली टाऊनहॉल आणि ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे हे कार्यक्रम होणार आहेत.
सप्ताहाच्या कालावधीत संकर्षण कऱ्हाडे यांचे ‘नियम व अटी लागू’, सचिन खेडेकर अभिनीत ‘भूमिका’, भाऊ कदम अभिनीत ‘पहिली लग्नाची दुसरी प्रेमाची’, स्वप्नील जोशी आणि विदुला चौगुले अभिनीत ‘लग्नपंचमी’, तसेच संजय नार्वेकर, सुनील तावडे आणि सहकाऱ्यांचे ‘भ्रमाचा भोपळा’ यांसह विविध नाट्यप्रयोग रंगणार आहेत.
याशिवाय ‘द फोक महाराष्ट्र – ओळख माझ्या महाराष्ट्राची’, ‘सणयात्रा’, ‘स्वर मराठी मनाचा’, ‘चांगभलं – व्हॉईस ऑफ दख्खन’, ‘मी मराठी’, ‘म…मराठीचा’ यांसारख्या कार्यक्रमांतून महाराष्ट्राची लोककला, संगीत आणि सांस्कृतिक वैभवाचा जागर केला जाणार आहे. साहित्यप्रेमींसाठी ‘अभिजात मराठी भाषेचा प्रवास’ आणि ‘मराठी साहित्याचे विश्व’ यांसारख्या विषयांवर परिसंवाद व चर्चासत्रेही आयोजित करण्यात आली आहेत.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यम प्रतिनिधींनी टिपलेल्या निवडक छायाचित्रांचे विशेष प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन ३ ते ९ ऑक्टोबरदरम्यान प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील कला दालनात सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत नागरिकांसाठी खुले राहणार आहे.
सप्ताहातील सर्व कार्यक्रम नागरिकांसाठी विनामूल्य असून, शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मराठी भाषेच्या संवर्धनाची लोकचळवळ अधिक व्यापक करावी, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
“मराठी भाषेला ‘अभिजात’ दर्जा मिळणे हा महाराष्ट्राच्या समृद्ध भाषिक आणि सांस्कृतिक परंपरेचा गौरव आहे. हा गौरव केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता साहित्य, लोककला, संगीत, नाट्य आणि सांस्कृतिक वैभव नव्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. याच उद्देशाने अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे,” असे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.
आजपासून सुरू झालेला हा सप्ताह ९ ऑक्टोबरपर्यंत रंगणार असून, सात दिवस पिंपरी-चिंचवडमध्ये मराठी भाषा आणि संस्कृतीचा उत्सव अनुभवायला मिळणार आहे.


