Thursday, February 6, 2025
Homeअर्थविश्व२०२३-२४ मालमत्ता कराच्या देयकांचे वितरण महिला बचत गटांमार्फत करण्याचा पिंपरी-चिंचवड महापालिकेचा निर्णय…

२०२३-२४ मालमत्ता कराच्या देयकांचे वितरण महिला बचत गटांमार्फत करण्याचा पिंपरी-चिंचवड महापालिकेचा निर्णय…

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान, त्यांचे आर्थिक उत्पन्नवाढीसाठी पवनाथडी जत्रेसारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत. आता महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी २०२३-२४ या आर्थिक वर्षांतील मालमत्ताकराची देयके बचत गटाच्या महिलांमार्फत घरपोच वितरित करण्यात येणार आहेत. लवकरच देयक वाटपाचे काम हाती घेतले जाणार आहे.

शहरात मालमत्तांची संख्या वाढत आहेत. सद्य:स्थितीत पाच लाख ९४ हजार मिळकतींची नोंद असून, ११ लाख ८८ हजार देयके छापण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी महापालिकेने प्रथमच टपाल विभागामार्फत देयके वितरणाचा निर्णय घेतला होता. त्यासाठी १८ लाख रुपये खर्चही करण्यात आला. मात्र, शहरातील विविध भागातील मालमत्ताधारकांना देयके मिळाली नसल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. त्यामुळे टपाल खात्याऐवजी शहरातील नोंदणीकृत बचत गटाच्या महिलांमार्फत मालमत्ता कराची देयके वितरित करण्यात येणार आहेत.

मालमत्ताकराच्या देयकात ‘बारकोड’ची सुविधा
मालमत्ताधारकांना घरबसल्या मिळकतीसंदर्भात विविध सुविधा पालिकेच्या वतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यंदा देयकांमध्येच कर भरण्यासाठी बारकोडची व्यवस्था करण्यात आली आहे. बारकोड स्कॅन केला, की कराचा भरणा करणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर या बिलामध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरणासाठी वार्षिक ७२० रुपये आकारण्यात येणार असून, त्याचाही बिलात समावेश आहे.

शहरातील महिला बचत गटांना उत्पन्न मिळावे, यासाठी बचत गटाच्या महिलांमार्फत मालमत्ताकराची देयके वितरित करण्यात येणार आहेत. यासाठी पालिकेच्या समाजविकास विभागाकडील नोंदणीकृत बचत गटाची माहिती घेण्यात आली आहे. बचत गटातील महिलांना आपापल्या परिसराची माहिती असते. त्यामुळे मालमत्ता कराच्या देयकावरील पत्त्याचीही दुरुस्ती केली जाणार आहे. -नीलेश देशमुख, सहायक आयुक्त, करआकारणी व करसंकलन विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments