पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकातील क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्यास तसेच महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास देखील आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, आरोग्य वैद्यकीय अधिकारी तथा विचार प्रबोधन पर्वाचे मुख्य संयोजक डॉ. पवन साळवे,उपआयुक्त रविकिरण घोडके, विशेष अधिकारी किरण गायकवाड, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, वामन नेमाने, कनिष्ठ अभियंता तथा संयोजक विजय कांबळे, जनसंपर्क विभागाचे वासिम कुरेशी, प्रफुल्ल पुराणिक, देवेंद्र मोरे, अभिजित डोळस, विनोद सकट, माजी नगरसेवक गोरक्ष लोखंडे, सतिश दरेकर, कामगार नेते प्रल्हाद कांबळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आनंदा कुदळे, तुकाराम गायकवाड तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारील मैदानात महानगरपालिकेच्या वतीने दि. ११ ते १५ एप्रिल २०२३ दरम्यान पाच दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी १० वाजता या ठिकाणी प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमांना उत्साहात प्रारंभ झाला. शाहीर शितल साठे आणि सचिन माळी यांच्या “नवयान महाजलसा” या प्रबोधनात्मक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकत पहिले पुष्प गुंफले. त्यानंतर कुमार आहेर यांच्या ‘मी जोतीराव फुले बोलतोय” या एकपात्री नाट्यप्रयोगाने महात्मा जोतीराव फुले यांचा जीवनप्रवास डोळ्यांसमोर उभा केला. तसेच महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे महामानवांना अभिवादन करण्यात आले. दुपारच्या सत्रात ख्यातनाम गायक राहुल शिंदे आणि विजय सरतापे यांचा गीतगायनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर राहुल कांबळे यांनी महामानवांच्या गीतांचा अनोखा नजराना सादर करत उपस्थितांमध्ये स्फुरण भरले.