उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस महाराष्ट्र महापौर परिषदेतर्फे ‘ब’ वर्ग महानगरपालिकांच्या गटात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार घोषित झाला आहे. महाराष्ट्र महापौर परिषद परिषदेच्यावतीने महाराष्ट्र राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महापालिकांना दरवर्षी पुरस्कार देण्यात येत असतो. यासाठी प्रश्नावलीद्वारे महापालिकांकडून माहिती मागविण्यात येत असते. या कामाचे परीक्षण करून पुरस्कारार्थींची निवड करण्यात येत असते.
सन २०१८-१९ या वर्षात विविधमहापालिकांनी केलेल्या कामांची माहिती महाराष्ट्र महापौर परिषद आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या वतीने मागविण्यात आली होती. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनेदेखील यात सहभाग घेत आपण केलेल्या कामांची माहिती पाठवली होती. महापालिकेचे प्रशासकीय कामकाज, विविध सभांच्या कामकाजाची कार्यपद्धती, अर्थसंकल्पीय नियोजन, राबविलेल्या विविध योजना, उपक्रम, ऑनलाईन सेवा सुविधा, केंद्र आणि राज्य शासनाच्या महानगरपालिकांसाठी असलेल्या योजनाची अंमलबजावणी, विविध ठिकाणच्या आरक्षित भूखंडाचा विकास, पाणी पुरवठ्याचे सुयोग्य नियोजन, मल:निसारण योजनांची सर्व भागात केलेली कामे, घनकचरा व्यवस्थापन, कच-यापासून खत आणि वीज निर्मिती, महिला व बालविकास योजना, ज्येष्ठ नागरिक व निराधार व्यक्तींसाठीचे उपक्रम, कौशल्य विकास योजना, दिव्यांगासाठी राबविण्यात आलेल्या योजना, स्वच्छता, आरोग्य सुविधा, वैद्यकीय सुविधा आदी विविध स्तरावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
त्यामुळे ब वर्ग महानगरपालिकांच्या गटातपिंपरी चिंचवड महानगरपालिकेची प्रथम पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.७५ हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.महाराष्ट्र महापौर परिषदेचे कार्याध्यक्ष तथा अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष रणजीत चव्हाण यांनी याबाबतचे पत्र आज महाराष्ट्र महापौर परिषदेच्या वतीनेपिंपरी चिंचवड महानगरपालिकेस पाठविण्यात आले असून तत्कालीन महापौर उषा उर्फ माई ढोरे तसेच आयुक्त राजेश पाटील यांचे अभिनंदन देखील करण्यात केले आहे.