स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये देशात पिंपरी चिंचवड शहर अव्वल स्थानावर यावे यासाठी महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये नागरिकांचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे. या अभियानामध्ये सर्व घटकांतील नागरिकांचा व्यापक सहभाग वाढविणे तसेच माहिती, शिक्षण आणि संवादाद्वारे वर्तनामध्ये बदल घडविण्याच्या दृष्टीने जनजागृती करणे हा स्वच्छ सर्वेक्षणाचा हेतू आहे. या उपक्रमांतर्गत स्वच्छतेबाबत उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या सहभागी नागरिक, नागरिकांचा गट, सीएसआर प्रतिनिधी, स्वयंसेवक आणि बचतगट यांना ‘स्वच्छता चॅम्पिअन्स’ म्हणून महापालिकेच्या वतीने गौरविण्यात येणार आहे. या अभियानामध्ये नागरिक तसेच समाजातील सर्व घटकांनी व्यापक स्वरुपात सहभाग घ्यावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
पिंपरी चिंचवड शहराला देशातील सर्वात सुंदर व स्वच्छ शहर म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करण्याच्या दृष्टीने महापालिकेची वाटचाल सुरु आहे. त्यासाठी महापालिकेच्या वतीने अनेक उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमांमध्ये शहरातील नागरिकांचा प्रतिसाद उत्तम असून ते मोठ्या संख्येने सहभागी होतात. स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये पिंपरी चिंचवड शहराने सहभाग घेतला आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड शहर अव्वल स्थानावर यावे यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ‘स्वच्छता चॅम्पिअन्स’ या उपक्रमांतर्गत स्वच्छतेबाबत उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या नागरिक, नागरिकांच्या गटाला, सीएसआर प्रतिनिधी, स्वयंसेवक आणि बचतगट यांना महापालिकेच्या वतीने ‘स्वच्छता चॅम्पिअन्स’ म्हणून गौरविण्यात येणार आहे.
स्वच्छता चॅम्पिअन्स’ या उपक्रमात सहभागी होण्या-या नागरिकांचे वय १८ किंवा त्यापेक्षा अधिक असावे. या उपक्रमात सहभागी नागरिक किंवा नागरिकांचा गट पिंपरी चिंचवड शहरातील रहिवासी असावा. तसेच त्यांनी केलेले स्वच्छतेविषयक कामकाज हे पिंपरी चिंचवड शहरातील कार्यक्षेत्रात केलेले असावे. महापालिकेच्या वतीने १० महिला व १० पुरुष यांची स्वच्छता चॅम्पिअन्स करीता निवड करण्यात येणार आहे. त्यांना कोणत्याही स्वरूपाचे रोख बक्षीस देण्यात नसून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने त्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे.
या उपक्रमात सहभागी झालेल्या नागरिक किंवा नागरिकांच्या गटाने “स्वच्छता चॅम्पिअन्स” असा विषय नमुद करुन आपण केलेल्या स्वच्छता विषयक (आयईसी, ३आर प्रिन्सिपल,कचऱ्यापासून खतनिर्मिती, वृक्षारोपण, कचऱ्यापासून विविध वस्तू तयार करणे, पुनर्वापर, टाकाऊपासून टिकाऊ आदी.) उत्कृष्ट कार्याचे किमान ५० शब्दांत माहिती देणे आवश्यक आहे. व्यक्तीचे किंवा संस्थेचे नाव, संपर्क क्रमांक, कामकाज करतानाच्या फोटोसहीत sbm2020@pcmcindia.gov.in यावर ११ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी २ पर्यंत पाठवावी. त्यानंतर आलेली नोंदणी ग्राह्य धरली जाणार नाही, अशी माहिती महापालिकेचे स्वच्छ भारत समन्वयक तथा सहायक आयुक्त विनोद जळक यांनी दिली आहे.
शहरातील नागरिक, नागरिकांचे गट, सीएसआर प्रतिनिधी स्वयंसेवक,बचतगट यांनी जास्तीत जास्त संख्येने ‘स्वच्छता चॅम्पीअन्स’मध्ये सहभागी व्हावे,असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.