पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ३ ते ९ ऑक्टोबर २०२५ दरम्यान नाट्य, साहित्य, कविता, गझल, लोककला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी नागरिकांना अनुभवता येणार आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा तसेच महापालिकेचे भोसरी येथील श्री भैरवनाथ सार्वजनिक ग्रंथालय आणि चिंचवड येथील हुतात्मा चाफेकर सार्वजनिक ग्रंथालय यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी याबाबत माहिती दिली.
या सप्ताहात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा, साहित्यिक चर्चा, गझल, अभंग, भजन, कवी संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, ग्रंथ प्रदर्शने, मराठी चित्रपट कलाकारांशी हितगुज, पोवाडे, बालनाट्य एकांकिका, मराठी वेशभूषा, लोककला कार्यक्रम आणि नाट्यप्रयोग यांसारखे उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मराठी भाषेची अभिजात परंपरा, साहित्य आणि सांस्कृतिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी सांगितले.
मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकार, प्रख्यात साहित्यिक, कवी, गायक, व्याख्याते आणि संशोधक यांचा सहभाग होणार असून नागरिकांना मराठी भाषेच्या विविध अंगांचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे, असे विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांनी सांगितले.
सप्ताहातील कार्यक्रम प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह (चिंचवड), ग.दि. माडगूळकर नाट्यगृह (आकुर्डी प्राधिकरण), कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह (भोसरी), नटसम्राट निळू फुले नाट्यगृह (पिंपळे गुरव) आणि आचार्य अत्रे रंगमंदिर (पिंपरी) येथे होणार आहेत.
३ ऑक्टोबर रोजी ग्रंथदिंडी व शोभायात्रेने या सप्ताहाचा शुभारंभ होणार असून त्यानंतर उदघाटन समारंभ, नाट्यप्रयोग, कार्यशाळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी कार्यक्रममालिकेला सुरुवात होईल. सप्ताहभर एकांकिका, मराठी नाटके, गीत-संगीत कार्यक्रम, पत्रवाचन, साहित्य चर्चा, गझल गायन, लावण्य, लोककला, कविसंमेलन आदी बहुरंगी कार्यक्रम होणार आहेत.
९ ऑक्टोबर रोजी पारितोषिक वितरण समारंभ, ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे यांचा सत्कार आणि निमंत्रित कवींच्या कविसंमेलनाने ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’चा समारोप होणार आहे.
महापालिकेच्या वतीने नागरिकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


