पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पद्मभूषण पुलेला गोपीचंद आणि महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धा विजेत्या मंजुषा कनवर यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला असून ही बाब शहराच्या नावलौकिकात भर पाडणारी असल्याचे मत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी व्यक्त केले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका आणि पुणे जिल्हा व महानगर बॅडमिंटन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ८४ व्या राष्ट्रीय वरिष्ठ गट बॅडमिंटन स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने महापालिकेच्या पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह येथे दि.९ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ७ वाजता सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात पद्मभूषण पुलेला गोपीचंद, महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धा विजेत्या मंजुषा कनवर यांच्यासह विविध खेळाडू, प्रशिक्षक, बॅडमिंटन संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी पूनावाला फौन्डेशन चे जसविंदर नारंग, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी नागरिक उपस्थित राहणार आहेत.
शहरात महापालिकेच्या वतीने मोठ्या प्रमाणात विविध खेळांसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात आली असून याद्वारे शहरात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिभाशाली खेळाडू निर्माण होऊन लोकप्रिय तसेच दुर्मिळ खेळ व साहसी खेळ प्रकारांचे संवर्धन करण्यात येत आहे. शिवाय, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून यामुळे शहराच्या नावलौकिकात भर पडत आहे. शहरातील खेळाडूंना आपल्या खेळामध्ये दैदिप्यमान कामगिरी करण्याची प्रेरणा मिळावी, त्यांना मार्गदर्शन लाभावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी दिली आहे.
यावेळी पुणे जिल्हा व महानगर बॅडमिंटन असोसिएशन यांना ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा व महानगर बॅडमिंटन असोसिएशन या संघटनेच्या प्रतीकाचे अनावरण पद्मभूषण पुलेला गोपीचंद यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.