इंडस्ट्रीयल स्पोर्टस असोसिएशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या टी-२० क्रिकेट स्पर्धा २०२४ च्या अंतिम सामन्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रिकेट संघाने टाटा मोटर्स संघावर ५ गडी राखून विजेतेपद पटकावले.
पिंपरी चिंचवड कर्मचारी संघाने केलेल्या या दैदिप्यमान कामगिरीबद्दल महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी संघाचे कौतुक केले. सांघिक खेळामुळे एकतेची भावना निर्माण होते. त्यातूनच यशाला सहजपणे गवसनी घालता येते. महापालिका कर्मचारी क्रिकेट संघाने राहुल चावरिया यांच्या नेतृत्वाखाली मिळविलेल्या या यशाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नावलौकीकात भर पडली असून शहरासाठी ही अभिमानाची बाब आहे. महापालिका सेवेत राहून क्रिकेटसारख्या सांघिक खेळात या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन मिळविलेले यश कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी काढले.
विजयानंतर कर्मचारी संघाने आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेऊन त्यांच्याकडे चषक सोपविला, त्यावेळी कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देताना आयुक्त सिंह बोलत होते.विजेत्या संघाचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, मुख्य अभियंता श्रीकांत सवणे, उप आयुक्त मिनीनाथ दंडवते, संदीप खोत, मनोज लोणकर, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे तसेच महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी तसेच नागरिकांनीदेखील विजेत्या संघाचे अभिनंदन केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी क्रिकेट संघामध्ये विविध विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश होता. त्यामध्ये राहुल चावरिया (कर्णधार), विवेक मालशे, सचिन लोणे, विकास शिरवळे, महेश कुदळे, उमेश शिंगाडे, ओंकार कहाणे, निखिल आवाड, पलाश शिंदे, कृष्णा चव्हाण, विनोद साळुंखे, ओंकार पवार, गणेश कापसे, विजय बंडवाल, योगेश साठे, विपीन थोरमोटे, रवी माचरे यांचा समावेश आहे.
या संपुर्ण मालिकेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी क्रिकेट संघाचे फलंदाज सचिन लोणे यांना चषक देऊन गौरविण्यात आले. तर अंतिम सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूचा सन्मानदेखील पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रिकेट संघातील कृष्णा चव्हाण यांना मिळाला.
इंडस्ट्रीयल स्पोर्टस असोसिएशन यांच्या वतीने आयोजित स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील एकूण ३२ संघ सहभागी झाले होते. १६ जानेवारी २०२४ पासून या स्पर्धेला प्रारंभ झाला. या स्पर्धेचा अंतिम सामना आज पार पडला. अंतिम सामन्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजीमध्ये कृष्ण चव्हाण (३ बळी) राहुल चावरिया (२ बळी) विकास शिरवळे व सचिन लोणे यांनी प्रत्येकी १ बळी घेऊन टाटा मोटर्स संघाचे ८ गडी बाद करत त्यांना १२३ धावांवर रोखले. यानंतर फलंदाजीला आलेल्या पिंपरी चिंचवड क्रिकेट संघातील सलामीची जोडी राहुल आणि सचिनने चांगली सुरूवात करत संघाचा धावफलक हालता ठेवला. सचिन लोणे (३०) राहुल चावरिया (८) पलाश शिंदे (७) योगेश साठे (४) ओंकार कहाणे (३२) महेश कुदळे (नाबाद ३३) निखिल आवाड (नाबाद १) अशा धावा करत २० व्या षटकात पाच गडी राखून टाटा मोटर्स संघावर दणदणीत विजय मिळविला. आजपर्यंतच्या या स्पर्धेमध्ये सलग सहा वर्षे विजेतेपद पटकावले होते. अशा संघाला पिंपरी चिंचवड क्रिकेट संघाने मात देत टाटा मोटर्स संघाची विजेतेपदाची श्रृंखला खंडित केली.