पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदान समाप्तीच्या ४८ तास आधी जाहीर प्रचार बंदी लागू होणार आहे. त्यानुसार मंगळवार, दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता जाहीर प्रचाराचा कालावधी संपणार असल्याची माहिती आचार संहिता कक्षाकडून देण्यात आली आहे.
प्रचार कालावधी संपल्यानंतर इलेक्ट्रॉनिक तसेच प्रिंट मिडीयामधून कोणत्याही स्वरूपाचा प्रचार करता येणार नाही. यामध्ये मेसेजिंग ॲप्स व सोशल मिडीयाचा समावेश असून व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर (एक्स) आदी माध्यमांवरून प्रचार करण्यास बंदी राहणार आहे.
तसेच जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर सर्व राजकीय पक्ष व उमेदवारांनी प्रचाराशी संबंधित फलक, बॅनर्स, पोस्टर्स व अन्य साहित्य तात्काळ काढून टाकणे बंधनकारक आहे. सदर साहित्य वेळेत न काढल्यास मालमत्ता विद्रुपीकरण कायद्यानुसार संबंधित उमेदवारांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असून प्रचार साहित्य काढण्यासाठी होणारा खर्च उमेदवारांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट केला जाणार आहे.
तरी जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर कोणत्याही प्रकारचा प्रचार करू नये तसेच सर्व प्रचार साहित्य तात्काळ हटवावे, असे आवाहन आचार संहिता कक्ष प्रमुख तथा उपजिल्हाधिकारी सुरेखा माने यांनी केले आहे.


